एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर मेळावा, पंकजा मुंडे काय बोलणार?
पंकजा मुंडेंच्या सूचक फेसबुक पोस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच प्रश्नाची चर्चा आहे. ती म्हणजे 12 तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे कोणती घोषणा करणार?
बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज (12 डिसेंबर) जयंती आहे. या निमित्ताने आज गोपीनाथगडावर खास मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, गिरीश महाजन, विनोद तावडे यांच्यासह नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कालच पंकजा मुंडेंनी मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला आणि गोपीनाथगडावर जाऊन त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शनही घेतलं. पंकजा मुंडे आज बहुजन समाजाची एकत्र मोट बांधणार असल्याचं कळतं.
2014 मध्ये पहिल्या जयंतीदिनी गोपीनाथ गडाच्या भूमीपूजनाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर 2015 मध्ये मुंडेंच्या जयंती दिनी गोपीनाथ गडाच्या लोकार्पण सोहळ्याला भाजप अध्यक्ष अमित शाह हजर होते. त्यानंतर भाजपच्या नेत्या उमा भारती, सुरेश प्रभू आणि चंद्रकांत पाटील आले होते.
दरम्यान गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी समर्थकांची गर्दी होऊ लागली आहे. पोवाड्याच्या माध्यमातून या मेळाव्यासाठी वातावरण निर्मिती आणि समर्थकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
धनंजय मुंडे यांचं ट्वीट
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली. "आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा... जनसामान्यांच्या कल्याणाचा... सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन" असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट आणि चर्चांना उधाण
2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलेला पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला. पंकजा मुंडेंच्या पराभवामागे भाजप नेत्यांचाच हात असल्याचा आरोप खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी केला. या आरोपानंतर, वेगळा विचार करण्याची गरज असल्याची फेसबुक पोस्ट पंकजा मुंडेंनी शेअर केली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
पंकजा मुंडेंच्या सूचक फेसबुक पोस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच प्रश्नाची चर्चा आहे. ती म्हणजे 12 तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे कोणती घोषणा करणार? अशातच, भाजपमध्ये नाराज असल्यांची ज्यांची चर्चा असणाऱ्या खडसे, तावडेंनी पंकजा मुडेंना भेटण्याचा सिलसिला सुरु केला. त्यामुळे ही मंडळी भाजपला धक्का देऊन वेगळा गट निर्माण करणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र पंकजा मुंडेंनी बंडखोरी करणार नसल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला
पंकजा मुंडे आज सस्पेन्सचा द एन्ड करणार!
पंकजा मुंडेंच्या मनात भाजपाबद्दलचं स्थान कायम आहे की नाही याबद्दलचा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनातही आहे. त्याची प्रचिती गोपीनाथ गडावर मेळाव्याच्या तयारी दरम्यानही आली. सुरुवातीला लावलेल्या बॅनर्सवर्सवर भाजप आणि पक्षचिन्ह कमळाचा उल्लेख नव्हता. यावरुन तर्कवितर्कांना सुरुवात झाल्यानंतर ते बॅनर बदलण्यात आले.
पंकजा मुंडे एकनाथ खडसेंप्रमाणे उघड नाराजी व्यक्त करत नसल्या, तरी स्पष्ट भूमिका मांडण्याचं ते आवर्जून टाळत आहेत. आता पंकजा मुंडेंची मनधरणी करण्याचं भाजपातल्या ज्येष्ठ नेत्यांनी मनावर घेतलं आहे. पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्टनंतर निर्माण झालेला संभ्रम आणि सस्पेन्स यांचा द एन्ड स्वतः पंकजा मुंडेंच करणार आहेत...तोही गोपीनाथ गडावर. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या सोशल मीडियावरुन अधूनमधून गायब होणारं कमळ कायमचं गायब होणार? की आपलं स्थान अबाधीत राखणार? याकडे गल्लीपासून दिल्लीचंही लक्ष असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement