Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाटांनी बड्या वास्तुतज्ज्ञाच्या सल्ल्याने केले दालनात बदल, सूर्याची अतिनील आणि ताम किरणं कसा टाकतात प्रभाव?
Sanjay Shirsat: काही मंत्री परदेशात गेले आहेत, तर काही जण आपल्या मतदारसंघात आहेत, तर काही मंत्र्यांनी नवीन वर्षात आपला पदभार स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत.
मुंबई: महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगले आणि मंत्रालयातील दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. मात्र दालन मिळाल्यानंतर कार्यालयात वास्तुदोषाच्या भीतीपोटी अनेक मंत्र्यांनी आपल्या दालनामधील अंतर्गत रचनेमध्ये बदल केले आहेत, तर काही मंत्र्यांनी मजलेही बदलल्याची माहिती आहे. काही मंत्र्यांनी आपल्या दालनामध्ये विधिवत पूजाअर्चा करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे महायुती सरकारमधील मंत्र्यांची खाती आणि दालन यांचं वाटप होऊन देखील एक आठवडा उलटल्यानंतरही नऊ मंत्र्यांनी दालनांचा ताबा घेतलेला नाही. काही मंत्री परदेशात गेले आहेत, तर काही जण आपल्या मतदारसंघात आहेत, तर काही मंत्र्यांनी नवीन वर्षात आपला पदभार स्वीकारण्याच निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत. सहा मंत्र्यांनी दालनातील बैठक व्यवस्था वास्तुतज्ज्ञांच्या सल्ल्याने बदलण्याचे आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील दालनातून कामकाज सुरू केलेले नाही. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उत्पादन शुल्क विभागाची एक बैठक घेतल्यानंतर परदेशात गेल्याची माहिती आहे. दरम्यान, 42 मंत्र्यांपैकी 33 मंत्र्यांनी आत्तापर्यंत आपल्या दालनात प्रवेश केला आहे आणि पदभार स्वीकारला आहे. तर अनेक मंत्र्यांच्या नवीन दालने व बंगल्यांमध्ये बदल सुरू करण्यात आले आहे. सहा मंत्र्यांनी वास्तुतज्ज्ञांचा सल्ला घेऊन मंत्र्यालयातील दालनाची फेररचना करण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी वास्तुतज्ज्ञ डॉ. रविराज अहिरराव यांचा सल्ला घेतला असल्याची माहिती आहे. वास्तुतज्ज्ञ डॉ. रविराज अहिरराव यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातही 14 मंत्र्यांची दालने व बंगल्याचा वास्तुशास्त्राप्रमाणे बदल केला होता. त्यांच्या सल्ल्याने आता देखील अनेक मंत्री, आमदार, खासदार, घराची तसेच कार्यालयाची रचना बदलत असल्याचं दिसून येत आहे. संजय शिरसाटांसह सहा मंत्र्यांनी त्यांच्या दालनामधील बैठक व्यवस्था बदलण्याचे आदेश दिले आहेत. बाकी पाच मंत्र्यांची नावं सांगण्यास वास्तुतज्ज्ञांनी नकार दिला आहे.
वास्तूशास्त्रानुसार करण्यात येणाऱ्या बदलावर शिरसाटांची प्रतिक्रिया
शिवसेना शिंदे गटाते आमदार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, मला मिळालेलं दालन अडीच वर्षे बंद होतं. त्यामुळे त्यात बदल करणं आवश्यक होतं. 7 जानेवारीपासून त्यात नियमित कामकाज सुरू होणार आहे. आम्ही वास्तुशास्त्र मानतो. पण दालनामध्ये कोणतीही तोडफोड करणार नाही. जास्त सुशोभीकरण न करता हे बदल केले जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.