30th May In History: संघटित कामगार चळवळीचे जनक ना.म. जोशी यांचे निधन, अभिनेते परेश रावल यांचा जन्म; आज इतिहासात...
30th May In History: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक समजले जाणारे नारायण मल्हार जोशी यांचे निधन आजच्या दिवशी झाले. तर, चतुरस्त्र अभिनेते परेश रावल यांचा आज जन्म दिवस आहे. गोवा राज्याला आजच्या दिवशी राज्याचा दर्जा देण्यात आला.
30th May In History: प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक समजले जाणारे नारायण मल्हार जोशी यांचे निधन आजच्या दिवशी झाले. तर, चतुरस्त्र अभिनेते परेश रावल यांचा आज जन्म दिवस आहे. गोवा राज्याला आजच्या दिवशी राज्याचा दर्जा देण्यात आला. जाणून घेऊयात, महत्त्वाच्या घडामोडी...
1916: अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म
वाङ्मयीन पुस्तकांतील बोधचित्रांकरता, मुखपृष्ठांकरता ख्यातनाम झालेले मराठी चित्रकार दीनानाथ दलाल यांचा आज जन्मदिन. 1937 मध्ये जी.डी. आर्ट ही परीक्षा उत्तीर्ण होताच दलालांच्या कारकिर्दीस सुरुवात झाली. 1944 मध्ये दलाल आर्ट स्टुडिओची स्थापना करून दलालांनी मराठी प्रकाशनविश्वात पुस्तकांची मुखपृष्ठे, अंतरंगचित्रेरं रेखाटण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच लोकांना त्यांच्या कामातील कलात्मक ताकदीचा परिचय होऊ लागला. दलालांची चित्रे हिंदुस्थानी मातीशी नाते सांगणारी होती. आपल्या जीवनातले रंग घेऊनच ती नटलेली होती. त्यांची रेषा अत्यंत सशक्त आणि लवचीकही होती. तिच्यात जोरकस प्रवाहीपणही होते आणि हळुवार लयकारीची नजाकतही होती. भारतीय पारंपरिक चित्रशैलींचे संस्कार त्यांच्या चित्रात दिसत. वास्तववादी चित्रणातील त्यांचे कसब वादातीत होते. 1945 मध्ये दलालांनी ‘दीपावली’ या वार्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. दर्जेदार साहित्य व दलालांच्या उत्तमोत्तम चित्रांनी सजलेला ‘दीपावली’ अल्पावधीतच लोकप्रिय झाला.
1950 : अभिनेते परेश रावल यांचा जन्म
भारतीय सिनेसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते परेश रावल यांचा आज जन्मदिवस आहे. विनोदी भूमिकांबरोबरच खलनायकी आणि चरित्र कलावंतांच्याही भूमिका समर्थपणे केल्या आहेत. 'वो चोकरी' आणि 'सर' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. जवळपास 200 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सशक्त अभिनयाने त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या सर्व भूमिका मोठ्या ताकदीने साकारल्या.
केतन मेहता यांच्या 'सरदार' चित्रपटात त्यांनी भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांची प्रमुख भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक झाले होते. परेश रावल यांनी चित्रपटात यश मिळूनदेखील गुजराती रंगभूमीशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे. 2014 च्या निवडणुकीत ते भाजपचे खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते.
1955 : भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचे निधन
भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक असणारे नारायण मल्हार जोशी अर्थात ना.म. जोशी यांचे निधन आजच्या दिवशी झाले. 1901-1910 या काळात अहमदनगर व पुणे येथे खाजगी शाळांमधून, तर मुंबई व रत्नागिरी येथील शासकीय विद्यालयांमधून अध्यापन. हा अध्यापनाचा अनुभव जोशींना 1922-47 या काळात मुंबईमध्ये प्रौढांसाठी व औद्योगिक कामगारांकरिता प्रशिक्षणवर्ग चालविण्यास फार उपयोगी पडला.
समाजसेवेच्या इच्छेने 1909 मध्ये जोशी ‘भारतसेवक समाज’ या संस्थेचे सदस्य झाले. संस्थेच्या ज्ञानप्रकाश या मराठी दैनिकाच्या व्यवस्थापकीय कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. 1911 मध्ये ज्ञानप्रकाशाची मुंबई आवृत्ती काढावयाचे ठरल्यामुळे जोशींना मुंबईत राहणे भाग पडले. तेव्हापासून अखेरपर्यंत ते मुंबईतच राहिले. 1911 मध्येच त्यांनी ‘सामाजिक सेवा संघ’ (सोशल सर्व्हिस लीग) ही संस्था स्थापिली. या संस्थेच्या कार्याशी विविध नात्यांनी ते 1955 पर्यंत निगडीत होते.
जोशींनी 31 ऑक्टोबर 1920 साली ‘अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस’ (आयटक) ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन करण्यास मदत केली 1929 पर्यंत ते तिचे कार्यवाहही होते. या संघटनेमधील कम्युनिस्ट मतप्रणालीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर आपले वर्चस्व बसविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा 1929 साली नागपूर येथील अधिवेशनात आयटकमध्ये फूट पडली आणि जोशींना आयटक सोडावी लागली. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यानी नंतर ‘इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ अशी निराळी संघटना काढली. पुढे 1933 मध्ये ही संघटना ‘नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर’ ह्या संघटनेत सामावण्यात येऊन नवीन संघटनेचे ‘नॅशनल ट्रेड्स युनियन फेडरेशन’ असे नाव ठेवण्यात आले. याशिवाय जोशी अनेक कामगार संघटनांशी निगडीत होते. 1926 मध्ये त्यांनी ‘टेक्स्टाइल लेबर युनियन’ ही कापडगिरणी कामगारांची संघटना स्थापिली तिचे ते अध्यक्षही होते.
‘नॅशनल सीमेन्स युनियन’ या संघटनेचेही ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. भारतीय खलाशांच्या कामाच्या स्थितीबाबत जोशींनी मोठी कळकळ व आस्था दाखवून तीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. 'भारत सेवक समाजा'मध्ये युद्धविषयक व इतर धोरणांबद्दल मतभेद झाल्यामुळे 1940 मध्ये जोशींनी समाजाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गव्हर्नर जनरलच्या वटहुकुमांना विरोध करण्याकरिता त्यांनी 1937-38 मध्ये ‘मुंबई नागरी स्वातंत्र्य संघटना’ (बाँबे सिव्हिल लिबर्टीज युनियन) स्थापन केली. या संघटनेस पंडित नेहरूंचाही पाठिंबा मिळाला.
वॉशिंग्टन येथे 1919 मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या पहिल्या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी भारतीय कामगारवर्गाचे प्रतिनिधी म्हणून जोशींची भारत सरकारने नियुक्ती केली. अशा परिषदांच्या निमित्ताने 1922-48 या काळात जोशींनी सोळा वेळा यूरोपीय देशांना भेटी दिल्या व भारतीय कामगारांच्या दुःस्थितीकडे जगाचे लक्ष वेधले. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली.
गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विचारसरणीचा त्यांच्या मनावर अधिक प्रभाव होता. जात, धर्म, जन्म किंवा मालमत्ता यांवर अधिष्ठित अशा हक्कांना व भेदभावांना जोशींचा विरोध होता. आर्थिक व सामजिक समानता आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांवरील प्रतिस्थापित समाजरचना हे त्यांचे स्वप्न व ध्येय होते. हे ध्येय लोकशाहीवादी मार्गांनी प्राप्त करण्यावर त्यांचा अटळ विश्वास होता.
1987: गोवा राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा
गोवा हे भारतातील 26 वे घटकराज्य मान्य करण्यात आले. 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने 30 मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
.गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांची सरमिसळ विशेष जाणवते. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जाते. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे राज्य अशी गोव्याची ओळख आहे.
पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. 1961 मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे 450 वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला.निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे.
इतर महत्त्वाच्या घटना:
1778: फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक व्होल्टेअर यांचे निधन
1894 : इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १९६९)
1949: इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलीस यांचा जन्म.
1950: प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचे निधन
1981: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या.