30th August Headlines : रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेचा उत्साह, मुंबईत आजपासून 'इंडिया' आघाडीची बैठक; आज दिवसभरात...
30th August Headlines : आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह असणार आहे. मुंबईत विरोधकांची आघाडी 'इंडिया'च्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. देशव्यापी नेत्यांआधी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे.
30th August Headlines : आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी आहेत. आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह असणार आहे. कोळी समाजात नारळी पौर्णिमेला अतिशय महत्त्व असते. समुद्राला नारळ अर्पण करून पूजा केली जाते. त्यानंतर मासेमारीसाठी बोटी निघतात. तर, राज्यासह देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह असणार आहे. मुंबईत विरोधकांची आघाडी इंडियाच्या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. देशव्यापी नेत्यांआधी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे.
मुंबईत आजपासून 'इंडिया' आघाडीची बैठक
आजपासून 'इंडिया'च्या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीचा भाग म्हणून महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि अशोक चव्हाण ही पत्रकार परिषद घेणार आहे. 31 ऑगस्ट रोजीच्या 'इंडिया आघाडी'च्या बैठकीची मुंबईतील तयारी अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आला आहे.
प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर हजर राहणार
पुणे - प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर आज हजर राहणार आहेत. त्यानंतर प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
सोलापुरात नारळी पौर्णिमा आणि मार्कंडेय जयंती निमित्त मिरवणूक
सोलापूर – सोलापुरात नारळी पौर्णिमा आणि मार्कंडेय जयंती निमित्त मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत भारत राष्ट्र समितीचे अनेक नेते तेलंगणातून येण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री महंमद अली, अर्थमंत्री हरीश राव यांच्यासह चार मंत्री आज सोलापुरात येणार आहेत. सोलापुरात निघणाऱ्या या मिरवणुकीत एकूण 35 मंडळ सहभागी होणार असून जवळपास एक लाख पेक्षा अधिक पद्मशाली बांधव मिरवणुकीत सहभागी होतील.
नारळी पौर्णिमेचा उत्साह
- कोळी बांधवांकडून नारळी पौर्णिमा हा सण उत्साहात साजरा केला जातो. परंपरेप्रमाणे समुद्रदेवतेची पूजा आणि समुद्राला मच्छिमार बांधवांकडून नारळ अर्पण केला जातो. यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्याशिवाय, मुंबई आणि परिसरातील कोळीवाड्यांमध्ये नारळ फोडण्याची स्पर्धादेखील होते. कोकणात नारळ लढवणे म्हणजेच नारळाची लढाई हा एक वैशिष्ट्यपूर्ण खेळ मालवण समुद्र किनाऱ्यावर खेळला जातो. संध्याकाळी समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित केल्या जातात. यात प्रामख्याने महिलांच्या नारळ लढवण्याचे खेळ किनारपट्टी भागात पहायला मिळतात.
खड्ड्यांना ओवाळणी करून राखी बांधून रक्षाबंधन
भंडाऱ्यात वेगळ्या पद्धतीनं रक्षा बंधन साजरा होणार आहे. ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिलांच्या वतीनं भंडारा शहरात पडलेल्या खड्ड्यांना ओवाळणी करून राखी बांधून कुणाचाही अपघात होऊ नये, किंवा सर्वांचा सुखकर प्रवास व्हावा, यासाठी पूजा करण्यात आहे.