Kolhapur News : भूमि अभिलेख विभागातील गट क ची 28 ते 30 नोव्हेंबरला भरती परीक्षा
Kolhapur News : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापकतथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणार आहे.
Kolhapur News : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापकतथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी याबाबत माहिती दिली आहे. या भरती परीक्षेसाठी ०9 डिसेंबर 2021 रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांच्या परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर (https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत वेबसाईटवर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे, प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठीची लिंक देखील दिनांक 14 नोव्हेंबर 2022 पासून विभागाच्या वरील वेबसाईटवर उपलब्ध आहे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Agniveer Scheme : कोल्हापूरमध्ये ‘अग्निवीर’ भरतीसाठी जय्यत तयारी
दरम्यान, कोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या अग्निवीर भरतीसाठी 1 लाखांहून अधिक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. या भरतीसाठी यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या भरतीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.
भरतीला येणाऱ्या उमेदवारांना राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर एकत्र करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येकी 200 किंवा सैन्य दलाकडून मागणी होईल त्याप्रमाणे उमेदवारांना शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सोडण्यात येईल. त्याठिकाणी या उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या होतील. अग्निपथ योजनेंतर्गत, उमेदवारांना 4 वर्षांसाठी भरती केले जाईल. यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/म्युनिशन एक्झामिनर), अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर, टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन जनरल (8 वी पास) आणि अग्निवीर ट्रेड्समन टेक्निकल या पदांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या