28 November In History : महात्मा फुलेंची पुण्यतिथी, सेनापती बापट यांचे निधन; आज इतिहासात
28 November in history : आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात काय काय घडलंय? हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेकांची दिवसाची सुरुवात ही दिनविशेष वाचनाने होते. अनेक चांगल्यावाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. दिग्गजांचा जन्म-मृत्यू या नोंदींसह इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. क्रांतिकारक विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यातिथी आहे. आजच्याच दिवशी सेनापती बापट यांचे निधन झाले होते. त्याशिवाय आजच्याच दिवशी मेजर उन्नीकृष्णन यांना वीरमरण आले होते. ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले होते. तर न्यूझीलंडमध्ये आजच्या दिवशी पहिल्यांदा महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यासह इतिहासात अनेक घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
1890: महात्मा फुलेंची पुण्यतिथी (mahatma jyotiba phule death anniversary)
विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये कार्य करणारे महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची आज पुण्यतिथी. महात्मा फुले यांनी मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली होती. त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करुन पुण्यातील भिडे वाडा येथे शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
महात्मा फुले हे समाजसुधारणेच्या कार्यात अग्रभागी असेल तरी त्यांनी व्यावसायिक म्हणूनदेखील मोठे यश मिळवले होते. यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून महात्मा फुले यांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणे, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामे केली. क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्मय लिहिले आहे त्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूड', 'गुलामगिरी', 'ब्राह्मणाचे कसब' या ग्रंथांतून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे. त्यांच्या लिखाणात तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकत निर्माण करण्याची क्षमता होती. यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी समजले जातात.
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप विधवाविवाह पुनर्विवाह, शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड, आदी कार्येदेखील त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांनी पोवाड्याचे लेखन केले होते. 1882 मध्ये महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली होती. 1888 मध्ये मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.
1893 : न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा महिलांनी मतदान केलं
आजच्याच दिवशी न्यूझीलंडमध्ये महिलांनी मतदान केले होते. 28 नोव्हेंबर 1893 रोजी न्यूझीलंडमधीन निवडणुकीत महिलांनी मतदान केलं. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी तब्बल 110 वर्ष संघर्ष करण्यात आला. जगात सर्वात आधी महिलाना मतदानाचा हक्क न्यूझीलंडमध्ये मिळाला होता. भारतामध्येही महिलांना मतदानाचा अधिकार देण्यास परंपरावाद्यांकडून विरोध झालेला. पण स्वातंत्र्य लढ्यातील आधिनिक विचारांच्या नेत्यांनी समतेच्या मुल्याला प्राधान्य देत आणि भेदभाव टाळत महिलांना मतनाचा अधिकार दिला.
1964 : नासाचे मरीनर यान अंतराळात रवाना
28 नोव्हेंबर 1964 रोजी नासाचे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर रवाना झालं होतं. 260.8 किलो वजनाचं हे यानं होतं. तीन वर्षांपर्यंत हे यानं अंतराळात होतं. २१ डिसेंबर१९६७ रोजी या यानासोबत अखेरचा संपर्क झाला होता.
1967 : सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन
पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट यांचे 28 नोव्हेंबर 1967 रोजी निधन झाले होते. मुळशी सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केले म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही पदवी बहाल केली. महादेव तसेच गंगाबाई बापट यांचे हे पुत्र होत. त्यांचा जन्म पारनेर (जिल्हा अहमदनगर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक आणि बी. ए. पर्यंतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. त्यांनी अहमदनगरला मॅट्रिकची परीक्षा दिली, तेव्हा त्यांना संस्कृतची 'जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती' मिळाली. त्यांना बी. ए. परीक्षेत इ. स. 1903 साली उत्तीर्ण झाल्यावर मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते इंग्लंडला गेले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी गुप्तपणे बॉम्ब तयार करण्याची कला शिकून घेतली आणि त्यानंतर सेनापती बापट आणि हेमचंद्र दास या आपल्या सहकारी मित्रांना हे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला पाठविले. असे असले तरी "माझ्या बॉम्बमुळे एकही बळी गेला नाही. ते फक्त आमच्या कार्याकडे ल़क्ष वेधण्यास केले गेले होते" असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तरीही अलीपूर बॉम्ब खटल्यात सहभागी असल्याचा सेनापती बापटांवर आरोप होता. इ. स. 1921 पर्यंत ते स्वतःच्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि त्यांनी समाजसेवा हेच व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे आणि शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर निभावले.
इ. स. 1921 ते इ. स. 1924 या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले. या आंदोलनादरम्यान बापट यांना सेनापती म्हणून ओळखले जाऊ लागले. या आंदोलनात त्यांना तीनदा कारागृहावासाची शिक्षा झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. संस्थानांतल्या प्रजाजनांच्या हक्कांकरिता चालू असलेल्या आंदोलनांत भाग घेऊन त्यांनी संस्थानाच्या प्रवेशबंद्या मोडल्या आणि त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.
1996 : एअरबस ए 300 ला कंमाड देणारी पहिली महिला
1996 मध्ये कॅप्टन इंद्राणी सिंह एअरबेस ए- 300 ला कमांड देणारी पहिली महिला आहे. एयरबस ए-320 च्या आशियामधील पहिली महिला कमर्शियल पायलट राहिली आहे. त्याशिवाय लिटरेसी इंडियाची फाऊंडर सेक्रेटरी होती. इंद्रायणीनं दिल्लीमधून शिक्षण पूर्ण केलेय.
1975 : मायकल होल्डिंगचं कसोटीमध्ये पदार्पण
आजच्याच दिवशी 1975 मध्ये वेस्ट विंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी कसोटीमध्ये पदार्पण केले होते. मायकल होल्डिंग यांनी ६० कसोटी सामन्यात २४९ विकेट घेतल्या. तर १४२ एकदिवसीय सामन्यात १४२ विकेट्स घेतल्या आहेत.
2008 : मेजर उन्नीकृष्णन यांना वीरमरण (Sandeep Unnikrishnan)
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली. पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबई हादरवून टाकली होती. या हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना प्राणाची आहुती द्यावी लागली होती. या दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले, तर कित्येक लोकांनी आपलं सर्वस्व गमावलं. आजही दहा वर्षानंतर या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. याच हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना वीरमरण आलं. आजच्याच दिवशी मेजर उन्नीकृष्णन यांचं निधन झालं होतं. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचवले आणि त्यातच त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.
सिक्युरिटी गार्डसचे कमांडो मेजर असलेल्या संदीप यांनी ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्यात प्राणांची पर्वा न करता अनेक नागरिकांचे प्राण वाचवले. तसेच सहकारी कमांडोंनाही सुरक्षित बाहेर काढले. मात्र या लढाईत संदीप यांना प्राणांची आहुती द्यावी लागली. कारगिल युद्धात पाकिस्तानचा अगदी समोरून भयावह गोळीबार सुरू असतानाही त्यांनी केवळ सहा जवान हाताशी धरून पाकिस्तानी फॉरवर्ड चौकीच्या अगदी समोरच फक्त 200 मीटर अंतरावर पाकिस्तान्यांच्या नाकावर टिच्चून भारतीय चौकी उभारून सर्वांची वाहवा मिळवली होती.
26/11 चा दहशतवादी हल्ला हा भारतावरील सर्वात भीषण हल्ला होता. 26 नोव्हेंबर, 2008 रोजी शस्त्रास्त्रांसह पाकिस्तानातील दहा दहशतवादी कराचीहून समुद्रामार्गे बोटीने मुंबईत घुसले होते. या अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, ताजमहल हॉटेल, ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन हाऊसवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी सुमारे 60 तास धुमाकूळ घातला आणि या हल्ला 166 पेक्षा जास्त निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होती. मृतांमध्ये 28 परदेशी नागरिकांचा समावेश होता.
इतर महत्त्वाच्या घटना
1872 : गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म
1975 : मायकल होल्डिंगचं कसोटीमध्ये पदार्पण
1985 : अभिनेत्री ईशा गुप्ताचा जन्म
1986 : प्रतिक बब्बरचा जन्म
1988 : यामी गौतमीचा जन्म
2000 : तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर