(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जत तालुक्यातील आवंढी गावात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील आवंढी गावात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे.याबाबत पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देऊनही वेळेत उपचार न केल्याने जनावरांचा मुत्यू झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.
सांगली : जत तालुक्यातील आवंढी येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मोठी जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे. अनेक जनावरांना चावा घेतला आहे. याबाबत पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी कळवूनही वेळेत रेबिजची लस दिली नसल्याने या जनावरांचा मुत्यू झाला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पिसाळलेली काही कुत्री मारली गेलीत तर काही अजून मोकाट आहेत.
आवंढीत गेल्या आठवड्यात काही पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातला होता. या कुत्र्यांनी गावातील एक बैल, पाच गायी, त्यांची चार लहान वासरे आणि म्हशींचा चावा घेतला. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आवंढी पशूवैद्यकीय डॉक्टराना याबाबत माहिती दिली. मात्र, वेळेत उपचार झाले नाहीत. आणखी काही जनावरांना देखील पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांनाही रॅबिज झाल्याचा संशय आहे. त्यांना वेळेत लस, उपचार न मिळाल्यास तीही दगावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रुग्णालयाला अजुनही कायमस्वरूपी डॉक्टर नाही दरम्यान शासनाने लाखो रूपये खर्चुन आवंढी येथे श्रेणी 1 दर्जाच्या रुग्णालयाची प्रशस्त इमारत बांधली आहे. मात्र, या रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टर मिळालेला नाही. कित्येक वर्षापासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे कारभार देण्यात आला आहे. परिणामी वेळेत उपचार होत नसल्याने डोळ्यांदेखत मुत्यू होताना पाहावे लागत आहे. या प्रकाराची चौकशी करून संबधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.