20 November In History : प्रबोधनकार ठाकरे यांची पुण्यतिथी, प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांचे निधन; आज इतिहासात
Today in History : आज म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आज प्रबोधनकार ठाकरे यांची पुण्यतिथी जयंती आहे. जाणून घ्या आज घडलेल्या महत्वाच्या घडामोडी
मुंबई : भारतात क्रिकेट हा खेळ पॅशन बनला आहे. देशातील क्रिकेटचा इतिहास दोनशे वर्षांहून अधिक जुना आहे. परंतु भारतीय क्रिकेट संघाने 25 जून 1932 रोजी लॉर्ड्सवर पहिला कसोटी सामना खेळला आणि भारत कसोटी क्रिकेट खेळणारा सहावा देश बनला. आज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताचा दबदबा असला तरी कसोटी क्रिकेटमध्ये भारताला द्विशतक झळकावायला 23 वर्षे लागली. देशासाठी पहिले द्विशतक झळकावण्याचे श्रेय पॉली उमरीगरकडे आहे. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरच्या आधी सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपल्या बॅटने अनेक विक्रम रचले. परंतु त्यांच्या आधी बहुतेक विक्रम पॉली उमरीगरच्या नावावर होते. त्याने भारतासाठी पहिल्यांदा द्विशतक झळकावले. 20 नोव्हेंबर 1955 रोजी न्यूझीलंडविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. याबरोबरच 20 नोव्हेंबर 1973 रोजी प्रबोधनकार ठाकरे यांचे निधन झाले. केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते आणि इतिहासकार होते. महाराष्ट्राला लाभलेलं हे मोठं रत्न होतं. तसेच अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर 20 नोव्हेंबर 1997 रोजी रवाना झाली. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
1910 : रशियातील प्रसिद्ध लेखक लेव्ह टॉल्स्टॉय यांचे निधन
लेव्ह टॉल्स्टॉय हे रशियातील प्रसिद्ध लेखक होते. 9 सप्टेंबर 1828 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 20 नोव्हेंबर 1910 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्म रशियातील एका संपन्न कुटुंबात झाला. ते रशियन सैन्यात सामील झाले आणि क्रिमियन युद्धात (1855) भाग देखील घेतला. परंतु युद्धानंतर एका वर्षा त्यांनी सैन्यातील नोकरी सोडून दिली. त्याआधी त्यांनी साहित्याची निर्मिती केली होती. संपत्ती आणि साहित्यिक प्रतिभा असूनही टॉल्स्टॉय यांना मन:शांती हवी होती. शेवटी 1890 मध्ये त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचा त्याग केला. कुटुंब सोडून ते देवाची आणि गरिबांची सेवा करण्याच्या हेतून घराबाहेर पडले.
1917 : कलकत्ता येथे बोस संशोधन संस्थेची स्थापना
बोस इन्स्टिट्यूट ही कोलकाता मधील एक वैज्ञानिक संशोधन संस्था आहे. याची स्थापना भारताचे महान शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी 1917 मध्ये केली होती. बोस मृत्यूपूर्वी तीस वर्षे संस्थेचे संचालक होते. संस्थेने आशिया आणि भारतातील आंतरविद्याशाखीय संशोधनाची संकल्पना जागतिक ट्रेंडच्या अनुषंगाने मांडली.
1973 : पत्रकार आणि समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचे निधन
पत्रकार, समाजसुधारक, वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राचे पुढारी म्हणून महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणावर छाप सोडलेले केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1885 रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. महात्मा फुले त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली.
सामाजिक सुधारणांच्या मुद्यावर कोणतीही तडजोड केली नाही. बालविवाह, विधवांच्या केशवपनाची परंपरा, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, अस्पृश्यतेचा प्रश्न, हुंडाप्रथा आदी मुद्यांवर त्यांनी लढा दिला. त्यांच्याविरोधात पुण्यातील कट्टरतावाद्यांची त्यांची जिवंतपणी अंत्ययात्रा काढली होती. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो असे त्यांचे म्हणणे होते.
प्रबोधनकार ठाकरे हे राजर्षी शाहू महाराजाच्याही संपर्कात आले होते. शाहू महाराज हे स्वत: सुधारणावादी आणि परिवर्तन चळवळीचे नेतृत्व करणारे होते. प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे - अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली.
प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान दिले. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळसाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुत्र होते.
1955 : पॉली उमरीगरने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतासाठी पहिले द्विशतक झळकावले
देशातील क्रिकेटचा इतिहास दोनशे वर्षांहून अधिक जुना आहे. परंतु भारतीय क्रिकेट संघाने 25 जून 1932 रोजी लॉर्ड्सवर पहिला कसोटी सामना खेळला आणि भारत कसोटी क्रिकेट खेळणारा सहावा देश बनला. आज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताचा दबदबा असला तरी कसोटी क्रिकेटमध्ये भारताला द्विशतक झळकावायला 23 वर्षे लागली. देशासाठी पहिले द्विशतक झळकावण्याचे श्रेय पॉली उमरीगरकडे आहे. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरच्या आधी सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपल्या बॅटने अनेक विक्रम रचले. परंतु त्यांच्या आधी बहुतेक विक्रम पॉली उमरीगरच्या नावावर होते. त्याने भारतासाठी पहिल्यांदा द्विशतक झळकावले. 20 नोव्हेंबर 1955 रोजी न्यूझीलंडविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती.
1984 : प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांचे निधन
फैज अहमद फैज हे कवी, लेखक किंवा क्रांतिकारक आहेत. फैज यांनी लिहिलेल्या प्रत्येक नझमने, प्रत्येक रचनेने लोकांच्या आत एक वेगळी छाप सोडली आहे. ते फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातही प्रसिद्ध आहेत. फैज अहमद फैज यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1911 रोजी पंजाबमधील सियालकोट येथे झाला, जो आता पाकिस्तानमध्ये आहे. फैझ हे साहित्यिक वर्तुळात प्रसिद्ध असलेल्या शैक्षणिक कुटुंबातून आले होते. त्यांच्या घरी अनेकदा स्थानिक कवी आणि लेखकांचे संमेलन होत असे. या सर्व गोष्टींचा फैज यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला. सियालकोटमधील एका ब्रिटीश कुटुंबाने चालवलेल्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांना लहानपणापासूनच भाषेचे ज्ञान होते. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी लाहोरच्या प्रतिष्ठित सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण केल्यांतर ते अमृतसर कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवत होते आणि मासिक उर्दू मासिकाचे मुख्य संपादक होते.
1985 : मायक्रोसॉफ्ट विंडोज 1.0 लाँच
20 नोव्हेंबर 1985 या दिवशी मायक्रोसॉफ्ट विंडोजने विंडोज 1.0 ही पहिली आवृत्ती लाँच केली. बिल गेट्स यांनी 1983 मध्ये पहिल्यांदा विंडोज 1.0 लाँच केले. Windows 1.0 मध्ये 16-बिट कलर इंटरफेस होता आणि त्याचा आकार 1MB पेक्षा कमी होता. ते चालवण्यासाठी 256 KB RAM आवश्यक आहे. मात्र, विंडोज 1.0 खरेदी करण्यासाठी लोकांना आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागली. अखेर 20 नोव्हेंबर 1985 रोजी हे सॉफ्टवेअर सामान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
1989 : कुस्तीपटू बबिता फोगटचा जन्म
फ्री स्टाईल कुस्तीत देशाचे नाव कमावणारी हरियाणाची प्रतिभावान कुस्तीपटू बबिता फोगट हिचा जन्म 20 नोव्हेंबर 1989 रोजी झाला. तिने कॉमन वेल्थ गेम्समध्ये रौप्य पदके मिळवलं. तसंच जागतिक कुस्ती स्पर्धा कांस्य पदक मिळवलं आहे. यासोबतच स्कॉटलंड येथे झालेल्या 2014 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये बबिताने 55 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्तीमध्ये कॅनेडियन महिला कुस्तीपटू ब्रिटनी लेबरड्यूर कुस्तीपटूचा पराभव करून भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.
1994 : ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली
आपल्या अप्रतिम सौंदर्यामुळे ऐश्वर्या राय 20 नोव्हेंबर 1994 रोजी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड किताबाची मानकरी ठरली होती. यानंतर 1997 साली तिने सिनेक्षेत्रात पदार्पण केलं. तामिळ सिनेमा ‘इरुवर’ मधून तिने आपल्या अभिनय प्रवासाला सुरूवात केली. ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता.
1997 : कल्पना चावला पहिल्या अवकाश मोहिमेवर रवाना
अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर 20 नोव्हेंबर 1997 रोजी रवाना झाली. कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील कर्नाल येथे झाला. कल्पना चावला ही अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला आहे. कल्पनाचे एक स्वप्न होते, जे पूर्ण करण्यासाठी तिने संपूर्ण आयुष्य घालवले. कल्पनाने परदेशातून अंतराळात भारताचे नाव आणि सन्मान वाढवला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही ती अंतराळ प्रवासासाठी यानात बसली होती. परंतु, कोलंबिया स्पेस शटल क्रॅश झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
2016 : बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पहिले सुपर सीरिज जेतेपद पटकावले
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चायना ओपन सुपर सीरिजमध्ये चीनच्या सन यूचा पराभव करून 20 नोव्हेंबर 2016 रोजी पहिले सुपर सीरिज जेतेपद पटकावले. ती जागतिक क्रमवारीत असलेली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. ऑलिम्पिक खेळांमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक आणि कांस्य पदक जिंकणारी भारतातील पहिली खेळाडू आहे. ती भारताची नॅशनल चॅम्पियन देखील राहिली आहे.