20 April In History : नाझी हुकूमशहा हिटलरचा जन्म, भारतीय परराष्ट्र धोरणाला नवी दिशा देणारे इंद्रकुमार गुजराल पंतप्रधानपदी; आज इतिहासात
On This Day In History : भारतीय राजकारणी आणि तेलगु देशम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांचा आज जन्मदिन आहे. त्यांनी तीन वेळा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळलं.
20 April In History : जगाच्या इतिहासाच्या दृष्टीने आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटरलचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. त्यानंतर त्याने जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं. भारतीय परराष्ट्र धोरणाला गुजराल डॉक्ट्रिनच्या माध्यमातून नवी दिशा देणारे इंद्र कुमार गुजराल यांनी आजच्याच दिवशी भारताचे 12 पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्याचसोबत इतर कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या ते पाहू,
1889 : नाझी हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म
जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटणारा जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरचा (Adolf Hitler) जन्म 20 एप्रिल रोजी झाला. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा झालेला दारून पराभव त्याच्या जीवाला लागला आणि त्याने जर्मनीला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी राजकारणात प्रवेश केला. नाझी पक्षाच्या माध्यमातून 1933 साली हिटलरने जर्मनीचं चॅन्सेलरपद मिळवलं. जर्मनीच्या पतनाला ज्यू लोक कारणीभूत असल्याचं सांगत त्याने लाखो ज्यू लोकांची कत्तल केली.
जर्मनीची निर्विवाद सत्ता मिळवल्यानंतर संपूर्ण युरोपवर सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने हिटलरने पावले उचलली. त्यामुळेच जगभरात अस्थिरता निर्माण झाली आणि जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं गेलं. हिटलरने आपल्या कारकिर्दीत अनेक निष्पाप लोकांना ठार मारलं.
दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव समोर दिसू लागताच त्याने स्वतःला गोळ्या घालून आत्महत्या केली. 'माईन काम्फ' हे हिटलरने आपल्या जीवनावर आधारीत आत्मचरित्र लिहिलं आहे.
1950 : चंद्राबाबू नायडू यांचा जन्मदिन
नारा चंद्राबाबू नायडू म्हणजेच एन चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांचा जन्म 20 एप्रिल 1950 रोजी झाला. 1995 ते 2004 आणि 2014 ते 2019 असे तीन वेळा त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवलं. 2004 ते 2014 या काळात ते आंध्र प्रदेशचे विरोधी पक्षनेते होते. सन 1982 मध्ये एनटी रामाराव यांनी तेलुगू देसम पार्टी (TDP) ची स्थापना केली आणि 1983 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका जिंकल्या. चंद्राबाबू नायडू हे एनटी रामराव यांचे जावई होते. एनटी रामराव यांच्या निधनानंतर चंद्राबाबू हेच पक्षाचे सर्वेसर्वा झाले. 2019 साली त्यांच्या पक्षाला दारून पराभव स्वीकारावा लागला.
1960 : बासरीवादक पन्नालाल घोष यांची पुण्यतिथी
पन्नालाल घोष, ज्यांना अमलज्योती घोष म्हणूनही ओळखले जाते, ते भारतीय बासरीवादक आणि संगीतकार होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील संगीत वाद्य म्हणून बासरी लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांना जाते आणि ते "भारतीय शास्त्रीय बासरीचे प्रणेते" देखील होते.
1997: इंद्र कुमार गुजराल देशाचे 12 वे पंतप्रधान बनले
इंद्रकुमार गुजराल (Inder Kumar Gujral) यांनी 20 एप्रिल 1997 रोजी देशाचे 12 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक, भारतीय डिप्लोमॅट आणि राजकारणी असा प्रवास त्यांचा प्रवास होता. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. एप्रिल 1997 मध्ये भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात विविध पदांवर काम केले. त्यांनी दळणवळण मंत्री, संसदीय कामकाज मंत्री, माहिती प्रसारण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी काही काळ बीबीसीच्या हिंदी सेवेत पत्रकार म्हणूनही काम केले.
पंजाबमध्ये जन्मलेले गुजराल हे ते विद्यार्थी दशेत असताना राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित झाले आणि ते ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील झाले. भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. स्वातंत्र्यानंतर, ते 1964 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले आणि राज्यसभेचे खासदार झाले.
आणीबाणीच्या काळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. 1976 मध्ये त्यांची सोव्हिएत युनियनमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1996 मध्ये, ते देवेगौडा मंत्रालयात परराष्ट्र व्यवहार मंत्री झाले आणि या काळात त्यांनी गुजराल सिद्धांत ( Gujral Doctrine) विकसित केली. त्या माध्यमातून त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणांमध्ये प्रभावी बदल केला. 1997 मध्ये त्यांची भारताचे 12 वे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा कमी होता. सन 1998 मध्ये ते सर्व राजकीय पदांवरून निवृत्त झाले. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 2012 मध्ये वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
2004 : शास्त्रीय गायक कोमल कोठारी यांचे निधन
कोमल कोठारी यांनी लोककलांच्या जतनासाठी उल्लेखनीय योगदान दिले होते. राजस्थानातील लोककला , लोकसंगीत आणि वाद्ये , लुप्त होत चाललेल्या कलांचा शोध इत्यादींसाठी त्यांनी बोरुंडा येथे रुपायण संस्थेची स्थापना केली. 2004 मध्ये त्यांना भारत सरकारने कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2011 : इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV ने तीन उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या पाठवले
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) तिसरे ऑपरेशनल प्रक्षेपण PSLV-C3 हे PSLV चे एकूण सहावे मिशन होते. 20 एप्रिल 2011 रोजी इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLV ने तीन उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या स्थापित केले.