Radhakrishna Vikhe Patil : लम्पीमुळं राज्यात 2 हजार 100 जनावरांचा मृत्यू, डॉक्टरांनी हलगर्जीपणा करु नये, विखे पाटलांच्या सूचना
लम्पी स्कीनबाबत डॉक्टरांनी हलगर्जीपणा करु नये. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
![Radhakrishna Vikhe Patil : लम्पीमुळं राज्यात 2 हजार 100 जनावरांचा मृत्यू, डॉक्टरांनी हलगर्जीपणा करु नये, विखे पाटलांच्या सूचना 2 thousand 100 animals died in the state due to Lumpy Skin Disease, make careful planning, Minister Radhakrishna Vikhe Patil instructions to the officials Radhakrishna Vikhe Patil : लम्पीमुळं राज्यात 2 हजार 100 जनावरांचा मृत्यू, डॉक्टरांनी हलगर्जीपणा करु नये, विखे पाटलांच्या सूचना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/05/e158270c65f72c97f55e5d0641b372381664952713448339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lumpy Skin Disease : राज्यात लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहे. त्यामुळं राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. लम्पी स्कीनमुळं आत्तापर्यंत राज्यात 2 हजार 100 जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी डॉक्टरांना काही सूचना केल्या आहेत. डॉक्टरांनी हलगर्जीपणा करु नये. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
राज्यामध्ये आत्तापर्यंत लम्पी आजाराने 2 हजार 100 जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये. लागण झाली तर मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सोलापूर तेथील नियोजन भवन येथे लम्पी आजाराबाबत राज्य टास्क फोर्सच्या बैठकीत विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. बिकाणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
जनावरांचा मृत्यू होऊ देऊ नका
राज्यात गाय वर्गीय जनावरांना लम्पी आजार होऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी संशोधन करुन मृत्यू नेमका होण्याचे कारणे शोधून उपाययोजना काय कराव्यात, हे सूचवावे असे विखे पाटील म्हणाले. पशुधन मालकांची पशु ही संपत्ती आहे. जनावरांचा मृत्यू होऊ देऊ नका. बरी झालेली जनावरे लम्पी आजार न झालेल्या जनावरांमध्ये मिसळणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी असेही विखे पाटील यावेळी म्हणाले. टास्क फोर्सने राज्यातील सर्व जिल्हानिहाय पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांची ऑनलाईन कार्यशाळा घेवून मार्गदर्शन करावे. जनावरांची कोणती तपासणी करावी, निदान काय येईल, यावर कोणते उपचार करावेत, याविषयी कार्यशाळेत योग्य मार्गदर्शन करावे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावनिहाय नकाशे करावेत. जनावरांचे पर्यवेक्षण करून उपचार करावेत. यामध्ये स्थानिक डॉक्टरांनी हलगर्जीपणा करू नये, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
15 व्या वित्त आयोगातून ॲम्बुलन्स घ्याव्यात
जिल्ह्यात लसीकरणासाठी वाहनांची आवश्यकता असल्यास 15 व्या वित्त आयोगातून ॲम्बुलन्स घेता येतील. शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे असलेल्या विना चालक रुग्णवाहिका तीन महिन्यासाठी घ्याव्यात. या रुग्णवाहिका लसीकरणासाठी वापरता येतील. पशुधन जास्त असलेल्या तालुक्यात दोन रुग्णवाहिका वापरुन लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना देखील विखे-पाटील यांनी दिल्या.
एक कोटी 8 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण
राज्यात एक कोटी 40 लाख जनावरे असून एक कोटी 15 लाख लस मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. सर्वांना वेगाने लसीकरण सुरू असून एक कोटी 8 लाख जनावरांचे लसीकरण झाले आहे. सध्या 52 हजार पशुबाधित असून 2 हजार 100 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाही म्हशींची समावेश नसल्याने म्हैशीची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली. वेळेत निर्णय आणि गतीने लसीकरण सुरू केल्याने दोन हजार गावात लम्पी कमी होतोय. अत्यवस्थ जनावरे कमी होत आहेत, सध्या किरकोळ आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत.
लसीकरण झाल्याशिवाय मृत्यूदर कमी होणार नाही
संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय मृत्यूदर कमी होणार नसल्याचे मत टास्क फोर्सचे डॉ. बिकाणे यांनी सांगितले. मृत्यू होणाऱ्यामध्ये वयस्क, आजारी जनावरे, गाभण असलेले, लहान वासरे यांचा समावेश आहे. यामुळे अशा जनावरांची पशुपालकांनी काळजी घ्यावी. अजून आठ ते 10 दिवस लम्पी आजाराचे रूग्ण निघतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या:
- Lumpy Skin : आतापर्यंत 72 लाख पशुधनास लसीकरण, विखे पाटलांची माहिती, आता महाविकास आघाडीच सरकार असतं तर....
- Lumpy Skin Disease : दूध तुटवडा असल्याची अफवा पसरवल्यास कारवाई होणार, विखे पाटलांची माहिती, पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)