2 April In History: जागतिक ऑटिझम दिन, छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक, टीम इंडियाची विश्वचषकाला गवसणी; आज इतिहासात...
2 April In History: भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
2 April In History: भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांच्या मार्गावर नेणारे छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक आजच्या दिवशी झाला. तर, पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनी आजच्या दिवशी अंतराळात उड्डाण घेतले होते. तर, क्रिकेट विश्वात टीम इंडियाने 28 वर्षांनंतर विश्वचषकाला गवसणी घातली होती. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, कपिल शर्मा यांचा आज वाढदिवस आहे.
जाणून घेऊयात आजच्या दिवशी अर्थात 2 एप्रिल रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...
जागतिक ऑटिझम दिन (World Autism Awareness Day)
दरवर्षी 2 एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिन (World Autism Awareness Day) साजरा केला जातो. ऑटिझम हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. या आजाराबाबत जागरुकता येण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 2 एप्रिलपासून जागतिक ऑटिझम दिन (World Autism Awareness Day) साजरा करण्यास सुरुवात केली.
मुलांमध्ये हा आजार 1-3 वर्षांच्या दरम्यान सुरू होतो. या आजारामुळे मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही. मुले आत्मग्न होतात. कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहू लागतात.ऑटिझमवर अजून कोणताही अचूक उपचार उपलब्ध नाही. मुलाची स्थिती पाहून काय उपचार करायचे हे डॉक्टर ठरवतात. थेरपी, बिहेवियर थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, आय कॉन्टॅक्ट थेरपी, फोटो थेरपी इत्यादी थेरपी त्याच्या उपचारात केली जाते. या थेरपीने जवळपास सर्व मुले बरी होतात. मुलांच्या उपचारात डॉक्टरांबरोबरच पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
1870 - पुणे सार्वजनिक सभेची स्थापना
गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी 2 एप्रिल 1870 रोजी पुणे सार्वजनिक सभेची' स्थापना केली.या संस्थेतर्फे त्यांनी जी विधायक आणि समाजोपयोगी कामे केली,त्यामुळे त्यांना 'सार्वजनिक काका' हे टोपणनाव मिळाले.राजकारणाचे आद्यपीठ किंवा कांग्रेसची जननी म्हणता येईल अशी 'सार्वजनिक सभा'ही जनतेची गाऱ्हाणी सरकार दरबारी आणि वेशीवर टांगणारी क्रियाशील संस्था होती.
1894 - छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक
महाराष्ट्राला पुरोगामी राज्याचा चेहरा देण्यात सिंहाचा वाटा असणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा आज राज्याभिषेक 2 एप्रिल 1894 रोजी झाला. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. प्राथमिक शिक्षण मोफत करणे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करणे, आरक्षणाच्या धोरणाची सुरुवात करणे, कोल्हापूर संस्थानात शेतीसह उद्योगाला चालना देण्यासारखी अनेक महत्त्वाची कार्ये त्यांच्या काळात पार पडली.
1984 - पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचे अंतराळात उड्डाण
इ.स. 1984 साली पहिले भारतीय अंतराळवीर विंग कमांडर आणि भारतीय वायुसेनेचे माजी पायलट राकेश शर्मा यांनी सोयुज टी-11 या अंतराळ यानातून उड्डाण केले. त्यांनी 7 दिवस 21 तास 40 मिनिटे अवकाशात प्रवास केला.
1969 - बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा वाढदिवस
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता, निर्माता अजय देवगण याचा जन्म. विशाल वीरू देवगण असे त्याचे मूळ नाव. अजय देवगणचे वडील वीरू देवगण भारतीय चित्रपटाचे एक दिग्गज अॅक्शन डायरेक्टर आणि निर्माते होते. अजय देवगणने मुख्य भूमिका साकारलेले अनेक चित्रपट गाजले. अजय देवगणने काही चित्रपटांची निर्मितीदेखील केली.
2011- टीम इंडियाची क्रिकेट विश्वचषकाला गवसणी
1983 सालानंतर जवळपास 28 वर्षांनंतर 2011 मध्ये टीम इंडियाने क्रिकेट विश्वचषक जिंकला. मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव करीत विश्वविजेतेपद मिळवले.