1st July In History: राष्ट्रीय डॉक्टर दिन, राज्य कृषी दिन, वसंतराव नाईक यांचा जन्म; आज इतिहासात
1st July In History:अन्नदाता शेतकऱ्याच्या सन्मानार्थ आज राज्यात एक जुलै हा दिवस कृषी दिन साजरा केला जातो. हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने हा दिवस साजरा करण्यात येतो.
1st July In History: आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. अन्नदाता शेतकऱ्याच्या सन्मानार्थ आज राज्यात एक जुलै हा दिवस कृषी दिन साजरा केला जातो. हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने हा दिवस साजरा करण्यात येतो. तर, भारतात आज राष्ट्रीय डॉक्टर दिनही साजरा करण्यात येतो. डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा होतो. त्याशिवाय इतरही महत्त्वाचे साजरे करण्यात येतात.
महाराष्ट्र कृषी दिन:
कृषी दिन हा 1 जुलै रोजी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. याबरोबरच या दिवशी 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केली जाते. वसंतराव नाईक यांचे भारतीय राजकारण, लोकशाही सक्षमीकरण व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना 'महानायक' म्हणून ही संबोधले जाते.
वसंतराव नाईक यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. भूमीहिनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवीण्याचे तसेच कृषीसंस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले. राज्यात त्यांच्याच काळात अकोला,राहुरी,परभणी आणि दापोली या चार कृषी विद्यापिठाची स्थापना झाली. राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल, राज्य अन्नधान्याच्या बाबतीत कसं स्वयंपूर्ण होईल यावर वसंतराव नाईकांनी विशेष लक्ष दिलं. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय डॉक्टर दिन (National Doctors Day)
दरवर्षी 1 जुलै रोजी देशभरात राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस समाजाची मोठ्या प्रमाणावर सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी साजरा करण्याचा दिवस आहे.
1 जुलै 1991 रोजी डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला. डॉ बीसी रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला आणि 1 जुलै 1962 रोजी मृत्यू झाला, हा एक विचित्र योगायोग होता. राजकारणी, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या आहेत.
जीएसटी दिन (GST Day)
आज जीएसटी दिवस आहे. जुनी अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलून 1 जुलै 2017 रोजी देशात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला. दरवर्षी १ जुलै हा दिवस जीएसटी दिवस म्हणून नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी साजरा केला जातो. 1 जुलै 2018 रोजी जीएसटी लागू झाल्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा करण्यात आला. जीएसटी ही स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कर सुधारणा मानली जाते. त्यामुळे देशातील अप्रत्यक्ष कर रचनेत आमूलाग्र बदल झाला आहे.
देशात 'एक देश-एक बाजार-एक कर' या कल्पनेला आकार देणे हा GST लागू करण्याचा उद्देश होता. जीएसटी लागू झाल्यानंतर सेवा कर, व्हॅट, खरेदी कर, उत्पादन शुल्क आणि इतर अनेक कर रद्द करण्यात आले. त्याची जागा जीएसटीने घेतली आहे. तथापि, मद्य, पेट्रोलियम उत्पादने आणि मुद्रांक शुल्क अद्याप जीएसटीमधून सवलत आहे आणि जुनी कर व्यवस्था लागू आहे.
राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट्स दिन (National CA Day)
1 जुलै 1949 मध्ये भारतीय संसदेने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ची स्थापना केली. त्यामुळे दरवर्षी 1 जुलै हा सीए दिवस म्हणून साजरा केला जातो. चार्टर्ड अकाउंटंट्सचा दिवस महत्त्वाचा आहे कारण तो कोणत्याही फर्ममधील सीएची भूमिका अधोरेखित करतो. आर्थिक स्टेटमेन्ट, कर भरणे, बुककीपिंग इत्यादी विकसित करण्यासाठी CA जबाबदार असतो. सनदी लेखापालांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी सीए दिन साजरा केला जातो.
1909: क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या केली.
मदनलाल धिंग्रा हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा विसाव्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.
लंडनमध्ये शिकत असताना मदनलाल हे होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. 1 जुलै 1909 रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या
1913: माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म
प्रख्यात कृषीतज्ज्ञ, प्रगतशील शेतकरी, राजनितीज्ञ आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच आज जन्मदिन आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम वसंतराव नाईक यांच्या नावे आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या कालावधीत जबाबदारी सांभाळली. वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात 1 जुलै हा दिवस कृषी दिन साजरा केला जातो.
1938: प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी केवळ बासरीच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचे काम केले नाही, तर संतूर वादक पंडित शिवशंकर शर्मा यांच्यासोबत 'शिव-हरी' नावाने काही हिंदी चित्रपटांमध्ये मधुर संगीतही दिले. या जोडीने चांदनी, डर, लम्हे, सिलसिला, फासले, विजय, साहिबान आदी चित्रपटांना संगीत दिले. पंडित चौरसिया यांनी 'सिरिवेनेला' या तेलुगू चित्रपटालाही संगीत दिले होते. ज्यात नायकाची भूमिका त्याच्या जीवनातून प्रेरित होती. या चित्रपटात सर्वदमन बॅनर्जी यांनी नायकाची भूमिका केली. याशिवाय प्रसिद्ध बॉलीवूड संगीतकार सचिन देव बर्मन आणि राहुल देव बर्मन यांच्या काही चित्रपटांमध्येही पंडितजींनी बासरी वाजवली होती.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कोणार्क पुरस्कार, पद्म भूषण, पद्म विभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले.
1955 : स्टेट बँक ऑफ इंडियाचा स्थापना दिन
स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट 1955 अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.
इतर महत्त्वाच्या घडामोडी
1860: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचे निधन.
1962: अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन यांचे निधन.
2015: डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.