15th May In History: संत कवयित्री संत जनाबाई यांचे निधन, क्रांतीकारक सुखदेव यांचा जन्म; आज इतिहासात
15th May In History: मराठा साम्राज्याच्या आव्हानात्मक काळात ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्या मराठा सेनापती खंडेराव दाभाडे यांचा स्मृतीदिनही आज आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तरुण वयात बलिदान देणारे सुखदेव यांचा जन्मदिवस आहे.
15th May In History: प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. प्रत्येक दिवसाचा ऐतिहासिक दिवसांशी संबंध असतो. आजच्या दिवशी जनमानसात लोकप्रिय असलेल्या संत कवयित्री संत जनाबाई यांचे निधन झाले. तर, मराठा साम्राज्याच्या आव्हानात्मक काळात ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्या मराठा सेनापती खंडेराव दाभाडे यांचा स्मृतीदिनही आज आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तरुण वयात बलिदान देणारे सुखदेव यांचा जन्मदिवस आहे.
1350 : संत जनाबाई यांचे निधन
संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव. तिच्या वडिलांनी जनाबाईंना दामाशेट शिंपी यांच्या पदरात टाकले, तेव्हापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.
संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते.
1817 : बंगाली समाजसुधारक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म
देवेंद्रनाथ टागोर यांना बंगाली समाजसुधारक, प्रखर राष्ट्रवादी, गद्याकार आणि ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू म्हणून ओळखले जाते. देवेंद्रनाथ यांचा जन्म 15 मे 1817 रोजी कलकत्ता येथे त्यांच्या जोडासाँको भागातील प्रसिद्ध वाड्यात झाला. द्वारकानाथ टागोर हे राममोहन रॉय यांचे सहकारी होते. लहानपणीच देवेंद्रनाथांना राजा राममोहन रॉय यांचे सान्निध्य लाभले. बालवयात तसेच किशोरवयातही ते राममोहन रॉय यांच्या विद्यालयात शिकले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची विद्यालयात ख्याती होती. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा शारदा देवींशी विवाह झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्याच्या हिंदू महाविद्यालयात झाले. राममोहन रॉय यांच्या नंतर देवेंद्रनाथ ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले व त्यांनी समाजाच्या कार्याला उत्कृष्ट वळण दिले.
1859 : फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पिएर क्युरी यांचा जन्म
भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंड सारखी खनिजे युरोनियम यापेक्षाही जास्त प्रमाणात उत्सर्जन करतात हे जगाला दाखवून दिले. रेडियम हे युरेनियमपेक्षा 1650 पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला 1 क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते.
1907 : क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म Sukhdev Birth Anniversary
भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू या तरुणी क्रांतीकारी त्रयींपैकी एक असलेले सुखदेव अर्थात सुखदेव थापर यांचा आज जन्मदिन.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक म्हणून सुखदेव यांना ओळखले जाते. त्यांचे मूळ नाव सुखदेव रामलाल थापर असे आहे. सुखदेव यांचा जन्म 15 मे 1907 रोजी लुधियानातील चौरा बाजार येथे झाला. आपल्या महाविद्यालयीन आयुष्यात ते स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले होते. भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तसेच रशियन राज्यक्रांती व जागतिक क्रांतिकारी साहित्याची छाननी करण्यासाठी लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच ठिकाणी भगत सिंह आणि इतर क्रांतिकारकांच्या संपर्कात ते आले असल्याचे म्हटले जाते.
भगत सिंग, कॉम्रेड राम चंद्र व भगवती सिंग व्होरा यांच्याबरोबर त्यांनी लाहोरमध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली. तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय करणे, शास्त्रीय विचारपद्धतीचा अवलंब करणे, जातिव्यवस्थेविरुद्ध-अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणे हे या संघटेनेचे मुख्य उद्दिष्ट होते. सुखदेव यांच्यावर पंडित राम प्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता. काकोरी कटातील आरोपींना ब्रिटीशांनी मृत्यूदंड, जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर तरुण क्रांतीकारकांनी पुन्हा नव्याने संघटना बांधली.
दिल्ली येथे 1928 मध्ये सर्व क्रांतिकारकांची गुप्त परिषद भरली होती. यामध्ये 'हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. या संघटनेने डाव्या विचारसरणीला स्थान दिले होते.
नोव्हेंबर 1928 मध्ये लाला लजपतराय यांनी सायमन कमिशन विरोधात निदर्शनाचे नेतृत्व केले होते. निदर्शनाच्या वेळी झालेल्या लाठीमारामध्ये ते जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड म्हणून ब्रिटिश अधिकारी साँडर्स याचा गोळ्या झाडून वध करण्यात आला.
भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत बॉम्ब फोडल्यानंतर ब्रिटीश हादरून गेले. त्यांनी 'हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’शी संबंधित असणाऱ्यांची धरपकड केली. त्यात सुखदेवही पोलिसांच्या हाती लागले. पुढे तपासात साँडर्सच्या हत्येच्या कटामध्ये सुखदेव यांचाही सहभाग असल्याचे आढळून आले. त्यानंतर भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. लाहोरच्या तुरुंगात 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत सुखदेव यांनाही फासावर चढविण्यात आले.
1967 : अभिनेत्री माधुरी दीक्षितचा जन्म Madhuri Dixit Nene Birthday
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आज जन्मदिवस. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. परंतु, ती अभिनेत्री झाली. माधुरीने अनेक हीट सिनेमे दिले आहेत. नैसर्गिक सौंदर्य, घायाळ करणारे हास्य आणि दिलखेच अदा असलेले नृत्य यामुळे माधुरीने अनेक वर्ष चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. माधुरीने 1984 साली "अबोध" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "दयावान" आणि "वर्दी" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर 1988 साली तिला तिचा पहिला मोठा चित्रपट तेजाब मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 2008 मध्ये भारत सरकारतर्फे तिला भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.