लातूरमधील धक्कादायक प्रकार, सतत रडते म्हणून तेरा दिवसाच्या भाचीची मामाकडून हत्या
भाचीच्या सततच्या रडण्याने मामाची रात्री झोपमोड होत होती. या सध्या कारणामुळे त्याने हे कृत्य केले आहे. या प्रकारामुळे त्या चिमुकलीचे नातलग हादरुन गेले आहेत.

लातूर : लातूरमध्ये अवघ्या 13 दिवसांच्या भाचीची मामाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाची सतत रडते त्यामुळे झोपमोड होते या क्षुल्लक करणावरुन या चिमुकलीची ड्रममध्ये बुडवून हत्या केली. लातूरमधील झरी बुद्रूक येथील ही घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक या गावी माहेरी असलेली महिला येथे बाळंतपणासाठी आली होती. तेरा दिवसांपूर्वी या महिलेने एका गोंडस मुलीस जन्म दिला. काही दिवसानंतर सदर महिला सासरी हुडगे वाडिस जाणार होती. मात्र याच काळात एक अप्रिय घटना घडली. शनिवारी सकाळपासून घरात ती नवजात मुलगी आढळून आली नाही. चिमुकली दिसत नाही म्हणून शोधाशोध सुरु करण्यात आली.
बराच वेळ शोधल्यानंतर मुलगी घराच्या बाजूला पाण्याच्या ड्रममध्ये मृत अवस्थेत आढळून आली. संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला. याची माहिती तात्काळ चाकूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या घटनेचा माग काढला असता चिमुरडीचा 20 वर्षीय मामा कृष्णा अंकुश शिंदे यानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. तिच्या सततच्या रडण्याने त्याची रात्री झोपमोड होत होती. या सध्या कारणामुळे त्याने हे कृत्य केले आहे. या प्रकारामुळे त्या चिमुकलीचे नातलग हादरुन गेले आहेत. चाकूर पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
या प्रकरणी शनिवारी अकस्मात मृत्यू म्हणून चाकूर पोलिसात नोंद करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ भंडे यांनी या प्रकरणाचा छडा लावला. तेव्हा या प्रकरणातील सत्य घटना समोर आली. रविवारी कृष्णा शिंदे याच्या विरुद्ध 330/20 कलम 302 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कृष्णा याच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
