भंडाऱ्यात तीन वाघांच्या शिकारी प्रकरणी 12 आरोपींना अटक
आरोपींनी 2015 मध्येही एका वाघाची शिकार केली होती. तर 2019 मध्ये एक वाघ आणि एका बिबट्याची शिकार केली होती, अशी कबुली दिली आहे.
भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सीतासावंगी वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या शेत शिवारात विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी किती आरोपी या प्रकरणात गुंतले आहेत, याचा शोध वनाधिकारी घेत आहेत.
गेल्या पाच वर्षात भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारी वाढल्या असून याठिकाणी आता बोटावरच मोजण्याइतके वाघ शिल्लक आहेत. गेल्या वर्षी उमरेह कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पातून वाघाच्या शिकारी प्रकरणी बहेलिया टोळीचा मोरक्या कुख्यात वन्यजीव तस्कर कटू पारधी याला वन विभागाने उत्तर प्रदेशातून अटक केली.नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांची शिकार केल्याची कबुली त्याने दिली असून सध्या कटू पारधी हा भांडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. मात्र कटू पारधी सारखे वन्यजीव तस्कर अजूनही जिल्ह्यात सक्रीय असून अशाच तस्करांच्या मुसक्या आवळण्यात वन विभागाला यश आले आहे.
27 जून रोजी तुमसर तालुक्याच्या शितसावंगी परिसरात सहा आरोपींनी शेत शिवारातून जाणाऱ्या 24 केव्हीच्या विद्युत प्रवाहातून लोखंडी तार जामिनीवर पसरवत वाघाची आणि रान डुकराची शिकार केली होती. मात्र वाघाच्या शिकरीचं बिंग त्यातीलच एका आरोपीने वन विभागाजवळ फोडले. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी सापळा रचत या प्रकरणातील मुख्य आरोपी मणिराम गंगबोर याला अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी 2015 मध्येही एका वाघाची शिकार केली होती. तर 2019 मध्ये एक वाघ आणि एका बिबट्याची शिकार केली होती, अशी कबुली दिली आहे. बाहेलिया टोळीचा प्रमुख कटू पारधी हा तुरुंगात शिक्षा भोगत असला तरी स्थानिक वन्यजीव तरस्कारांच्या संखेत वाढ झाली आहे.