11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया! पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रक्रिया लांबणीवर, कधी होणार यादी जाहीर?
राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. आज जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार आहे.

11th online admission process : राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. आज जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार आहे. शिक्षण संचालनालयाने याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे. 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या शाळा महाविद्यालय मधील एकूण प्रवेश क्षमतेमधील प्रवेशाबाबत फेरबदल करणे अपेक्षित आहे. तांत्रिक बाबींमुळे प्रवेश प्रक्रियेमधील दिनांक 26 जून 2025 ला जाहीर करण्यात येणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय संलग्न उच्च माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थी प्रवेश याद्या जाहीर करता येणार नाहीत.
संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करुन पारदर्शक व निकोप पध्दतीने प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार आहे . 30 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर एक ते सात जुलै दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा वेळ दिला आहे. दहावी बोर्ड परीक्षा निकाल जाहीर होऊन दीड महिना झाला अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत 12 लाख 71 हजार विद्यार्थी आहेत.
राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. निकाल जाहीर होऊन जवळपास आता दीड महिना होत आलाय. मात्र, अजूनही दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अकरावीमध्ये प्रवेश झालेला नाही. विद्यार्थी अजूनही पहिल्या गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. आज अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. या पहिला गुणवत्ता यादीची सर्व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. मात्र, आज जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार आहे. शिक्षण संचालनालयाने याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे.
जवळपास 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांची अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी
जवळपास 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरातून नोंदणी केली आहे. तीन वेळा वेळापत्रक बदलल्यानंतर आज पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, अजूनही गुणवत्ता यादी जाहीर करण्यासंदर्भात शिक्षण संचालनालयाकडून गोंधळ सुरू आहे. यामध्ये मुख्यत्वे करून सॉफ्टवेअर, वेबसाईटमधील तांत्रिक अडचणी आणि अल्पसंख्यांक संस्थांमधील आरक्षणासंबंधी झालेला गोंधळ, बदललेला निर्णय यामुळे हा उशीर गुणवत्ता यादी जाहीर करण्यास लागत असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या:
11th Admission 2025 : अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार की नाही? लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा, शिक्षण संचालनालयाचा गोंधळ सुरूच
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

























