(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोंदियातल्या मोरवाही गावात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या, पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय
दहावीची परिक्षा सुरु असताना अतुलची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. या संदर्भात गोंदीया ग्रामीण पोलिस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.
गोंदिया : गोंदियातल्या मोरवाही गावात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. अतुल तरोने असं हत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. काल मराठीचा पेपर देऊन घरी परतत असताना गावाशेजारी दबा धरुन बसलेल्या आरोपीनं मुलावर हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मोरवाही गावातील 17 वर्षीय अतुल तरोने हा दहावीत शिकत होता. मंगळवारी (3 मार्च) मराठी विषयाचा पेपर देऊन तो गावात परत येत असताना गावाशेजारी शेतात दबा धरुन बसलेल्या आरोपीने अतुलला अडवले. शेतात नेत त्याच्या गळ्यावर, पाठीवर आणि तोंडावर चाकुने वार केले त्यानंतर अतुलची जिभ देखील कापली आहे. घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी या संदर्भात पोलिसांना देखील माहिती दिली. मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. दहावीची परिक्षा सुरु असताना अतुलची अज्ञात आरोपीने हत्या केल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. या संदर्भात गोंदीया ग्रामीण पोलिस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.
SSC Students Murder | दहावीच्या विद्यार्थ्याची अज्ञात आरोपीकडून हत्या; गोंदिया जिल्ह्यातील घटना
दहावीची बोर्डाची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले आहेत. या मध्ये 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी आहेत. तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थिनी आहेत. परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रात किमान अर्धा तास आधी उपस्थित राहणं आवश्यक असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितल आहे. परीक्षा काळातल्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी राज्यात 273 भरारी पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.
जळगावमध्ये काल पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. परीक्षा सुरु होताच काही वेळातच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर आली. आणि अर्ध्या तासातच पेपर व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कॉप्यांचा प्रकार सुरु झाला. मात्र मराठीचा पेपर फुटला नसल्याचा दावा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे.