औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद, पुरातत्व विभागाचा निर्णय; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पुढील काही दिवस औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद करण्याची मागणी कबर कमिटीकडून करण्यात अली होती. त्यानुसार परिस्थितीती पाहता पुढच्या पाच दिवसांसाठी कबर बंद करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाने घेतला आहे.
Aurangzeb Tomb Closed: औरंगाबाद ( Aurangabad ) जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर आता पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाने घेतला आहे. तर घटनास्थळी ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. आठवड्याभरापूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर असलेले एमआयएमचे नेते तथा आमदार अकबरुद्दीन (Akbaruddin Owaisi) ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतले होते. यावरून मोठं राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुरातत्व विभागाने पुढील पाच दिवसांसाठी औरंगजेबाची कबर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलं आहे.
अकबरुद्दीन ओवेसी आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात दौलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतले. त्यांनतर याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळाले आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या. त्यातच मनसेच्या एका नेत्याने महाराष्ट्र्रात औरंगजेबाची कबर कशाला असा प्रश्न उपस्थितीत केला आणि आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले. तर दुसरीकडे दौलताबाद येथील स्थानिक नागरिकांनी औरंगजेबाची कबर बंद करण्याची मागणी केली. त्यांनतर यासर्व परिस्थितीचा आढावा घेत पुरातत्व विभागाने अखेर पुढील पाच दिवसांसाठी औरंगजेबाची कबर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस अधीक्षकांची पाहणी.....
गेल्या आठवड्यात ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतलं होते. त्यांनतर यावरून राजकीय वातावरण तापले असल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी सुरवातीला तीन कर्मचारी कबरीच्या ठिकाणी तैनात केले होते. मात्र त्यांनतर मनसे आणि इतर पक्षांनी घेतलेली भूमिका तसेच कबरीला होणार विरोध पाहता पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर बुधवारी औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी स्वतः औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. तसेच याठिकाणी बंदूकधारी पोलीस सुध्दा तैनात करण्यात आले. त्यांनतर आज पुरातत्व विभागाने कबर पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कबर कमिटीची मागणी......
औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात राजकारण सुरु असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. तर मनसेकडून औरंगजेबाची कबर कशाला असा प्रश्न उपस्थितीत केला. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवस औरंगजेबाची कबर बंद ठेवण्याची मागणी कबर कमिटीकडून पुरातत्व विभागाकडे करण्यात अली होती. त्यांनतर पुरातत्व विभागाने कबर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक......
ओवेसी यांनी दौलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर मनसेसोबतच अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर शिवरायांच्या महाराष्ट्र्रात औरंगजेबाची कबर कशाला असा प्रश्न या संघटनांनी उपस्थितीत केला आहे. तसेच हि कबर उखडून टाकण्याचीही मागणी काही संघटनांनी केली आहे.