LIC IPO : रशिया-युक्रेन युद्धाचा फटका; LIC चा आयपीओ पुढील आर्थिक वर्षी
LIC IPO Updates: रशिया आणि युक्रेन युद्धामुळे एलआयसीचा आयपीओ आता पुढील आर्थिक वर्षात येणार आहे.
LIC IPO Updates: रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम एलआयसी आयपीओवर झाला आहे. एलआयसीचा आयपीओ यंदाच्या आर्थिक वर्षात येण्याची शक्यता धूसर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, गुंतवणूक बँकर्सनी केंद्र सरकारला भारतातील सर्वात मोठ्या आयपीओसाठी घाई करू नये, अशी विनंती केल्यानंतर आता एलआयसीचा आयपीओ पुढील आर्थिक वर्षात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधाचा परिणाम परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांवर होण्याची दाट शक्यता आहे. रशियावर असणारे निर्बंध हे जागतिक गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे कारण ठरले आहे. रशियन बाजारात गुंतवणूक असणारे अमेरिकेचे गुंतवणूकदार तुर्तास तेथील गुंतवणूक काढून एलआयसीमध्ये गुंतवण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मूळतः मार्चमध्ये सुरू हा आयपीओ आणण्याची सरकारची योजना होती, परंतु रशिया-युक्रेन संकटामुळे स्टॉक मार्केट अत्यंत अस्थिर असल्याने अनेक योजना बाजारात येऊ शकल्या नाहीत. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमधील सुमारे 31.6 कोटी शेअर्स किंवा 5 टक्के भागभांडवलातून सरकारच्या तिजोरीत 60,000 कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज सरकारचा होता. खरंतर 13 फेब्रुवारी रोजी सरकारने सेबीकडे आयपीओसाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुदा दाखल केला, ज्याने त्याला गेल्या आठवड्यात मान्यताही दिली होती.
चालू आर्थिक वर्षात 78,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे कमी केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जीवन विमा कंपनीतील सुमारे 31.6 कोटी किंवा 5 टक्के भागभांडवल विकून सरकारला 60,000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती. मार्चपर्यंत शेअर विक्री न झाल्यास, सरकार सुधारित निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट मोठ्या फरकाने चुकवेल. 5 टक्के स्टेक डायल्युशनवर, एलआयसी आयपीओ हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा असेल आणि एकदा सूचीबद्ध झाल्यानंतर एलआयसीचे बाजार मूल्यांकन RIL आणि TCS सारख्या आघाडीच्या कंपन्यांशी तुलना करता येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या: