लातुरात धुवांधार पाऊस, मांजरा धरण 95 टक्के भरले, 152 गावांना सतर्कतेचा इशारा
Latur Rain Update : मुसळधार पावसामुळे लातूरला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण 95 टक्के भरले आहे.
Latur Rain Update : परतीच्या पावसाने लातूरला चांगलेच झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे लातूरला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण 95 टक्के भरले आहे. धरणाच्या वरील भागामध्ये मागील काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणारा पाण्याचा वेग वाढला आहे. धरणाच्या पुढील भागामध्ये मांजरा नदीवर असणारे 14 बॅरेजेसमधून अतिरिक्त पाणी सोडून द्यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून दिले आहेत. मांजरा नदीवर 14 मोठे प्रकल्प आहेत. मांजरा नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे नदीकाठ असणाऱ्या 152 गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला सर्व सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी दिली आहे.
मागील पाच दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे... आणखीन चार ते पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.. यामुळे जिल्हातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे... प्रत्येक तहसीलदारांना त्या त्या तालुक्यातील नदीकाठच्या गावात या सूचना पोहोचवण्याचे आदेश देण्यात प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये भागात मागील पाच दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहेत. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके, सोयाबीन, फुल शेती तसेच भाजीपाला पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
रेणापूर तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस -
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला. रेणापूर तालुक्यातील घनसरगाव ,खरोळा, कुंभारवाडी, तळणी या गावांसह लातूर ग्रामीण भागतील अनेक गावांत दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे काढणी करून शेतात ठेवलेल्या आणि काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते खचले आहेत... ग्रामीण भागातील छोटे पूल पाण्या खाली गेले आहेत. खरोला, फरदपुर सारख्या भागातील शिवारात पाणीच पाणी झाले आहे. शेतात पाणी थांबले असल्यामुळे शेतीचे नुकसान खूप झाले आहे.
पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा; सरकारचे स्पष्ट निर्देश
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानीचा सामना करावा लागत आहे. परतीच्या पावसानं शेती पिकांना मात्र, मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, यासह भाजीपाला द्राक्ष पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या परतीच्या पावसानं हिरावून घेतला आहे. राज्यात 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या 12 दिवसात सरासरी 7 दिवस पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करु नये असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.