Latur Fire: निलंगा येथील अपर्णा फ्लोअर मिलला भीषण आग, आगीत मशीनरीसह कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक
मध्यरात्री दोन वाजता अचानक अर्पणा फ्लोअर मिलला मोठी आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यात आली आहे.
लातूर: निलंगा येथील अपर्णा फ्लोअर मिलला भीषण आग (Latur Fire) लागली. या आगीत मशीनरीसह कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. मिलमधील मैदा आणि रव्याने भरलेल्या हजारो पोत्यांची राख झाली आहे.
अपर्णा फ्लोअर मिल ही निलंगा शहराजवळील निलंगा लातूर या मुख्य रस्त्यावर आहे. मध्यरात्री दोन वाजता अचानक अर्पणा फ्लोअर मिलला मोठी आग लागली होती. पाच एकरवर सदरील मिल उभी आहे. अत्याधुनिक मशिनीसह ही मिल उभी करण्यात आली होती. दोन शिफ्टमध्ये इथे काम सुरू असतं. आग लागली त्यावेळेस काही कामगार तिथे होते मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशामक दलास तात्काळ पाचारण करण्यात आलं होतं. मात्र तिथे असणारा गहू पीठ मैदा रवा याच्या पोत्यांनी आग पकडली होती त्यामुळे ही आग आटोक्यात आणण जिकरीचं होतं. खूप उशिरानंतर आग आटोक्यात आली.
हजारो पोते जळून खाक
आग लागल्याची माहिती मिळताच किल्लारी पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आगीची माहिती जिल्हा प्रशासनाला कळताच तात्काळ सूत्रे हलली होती. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत या ठिकाणी असलेला गहू आणि त्यापासून तयार झालेला पक्का माल जसे रवा मैदा गव्हाचं पीठ याची हजारो पोते जळून खाक झाली होती. फ्लोर मिलची संपूर्ण मशिनरी आगीच्या भक्षस्थानी पडली होती. या ठिकाणी असलेल्या इतर साहित्य फर्निचर हे सर्व जळून खाक झाले होते. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.