Latur Crime : आईला मारहाण करणाऱ्या बापाचा 23 वर्षीय मुलाने केला खून, लातूरच्या रेणुकानगरातील घटना
Latur Crime : आईला सातत्याने मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलाने रागाच्या भरात चाकूने भोसकून खून केल्याची घटना लातुरात घडली
Latur Crime : आईला सातत्याने मारहाण करणाऱ्या वडिलांना (Father) मुलाने अनेक वेळा समजावून सांगितले होते. मात्र आईला (Mother) होणाऱ्या मारहाणीत काहीही फरक पडला नाही. शेवटी मुलाने रागाच्या भरात वडिलांचा चाकूने भोसकून खून (Murder) केल्याची घटना लातुरात घडली. आरोपी मुलाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. 3 जून रोजी ही घटना घडली.
लातूर (Latur) येथील रेणुकानगरमध्ये सोमनाथ मधुकर क्षीरसागर (वय 48 वर्षे) हे पत्नी आणि मुलाबरोबर भाड्याने राहत होते. पत्नी मंगल हिला ते सतत मारहाण करत होते. याबाबत 23 वर्षीय मुलगा रोहित वडिलांशी भांडत होता. शेवटी मुलाने रागाच्या भरात वडिलांचं पोटात चाकू भोसकून खून केला.
नेमकं काय घडलं?
3 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सोमनाथ क्षीरसागर आणि त्यांची पत्नी मंगल क्षीरसागर यांच्यात पुन्हा वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. सोमनाथ क्षीरसागर यांनी त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यांची भांडण नेहमीची आहेत म्हणून शेजारीही कोणी भांडण सोडवण्याच्या भानगडीत पडले नाहीत. वारंवार घडणाऱ्या या प्रकाराचा राग रोहित क्षीरसागर याला आला आणि आईला मारहाण करणाऱ्या बापाचा त्याने जागीच खून केला. रोहितने घरातील चाकूने बापाच्या पोटात आणि छातीवर सपासप वार केले. आई मंगल यांनी मुलाला आवरण्याचा प्रयत्न केला मात्र संतापलेला मुलगा त्यांच्यासमोर बधला नाही. वार झाल्यानंतर सोमनाथ क्षीरसागर जमिनीवर कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मात्र डोळ्यादेखत आपल्या पोटच्या मुलाकडून आपल्याच पतीचा खून पाहण्याचा दुर्दैवी क्षण त्यांच्या आयुष्यात आला.
आरडाओरडा ऐकून आलेले शेजारी समोरील दृश्य पाहून हादरले
हत्या केल्यानंतर रोहितने घरातून पळ काढला. मंगल यांचा आरडाओरडा वाढल्याने शेजारीही धावत आले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबत मंगल क्षीरसागर यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करुन फरार झालेल्या रोहितचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. आज पहाटे पोलिसांनी रोहितला बेड्या ठोकल्या. एमआयडीसी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा