Latur News : लातूरकरांनो बैल पोळ्याचा सण साजरा करताय? त्याआधी जाणून घ्या प्रशासनाचे निर्बंध
Latur News : बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्बंध जारी केले आहेत.
लातूर : भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये बैलपोळा सणाचे (Bail Pola) विशेष महत्त्व आहे. यंदाच्या वर्षी बैलपोळ्यावर लम्पीचा परिणाम दिसून येत आहे. यामुळे प्रशासनाने पोळ्याच्या दिवशी बैल एकत्रित आणणे, बैलांची मिरवणूक काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे. बैलांच्या मिरवणुकीच्या वेळी अनेक पशुधन एकत्र येत असतात आणि त्यातून रोगाचा प्रसार होऊ शकतो हे टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
लातूर जिल्ह्यातील (Latur News) एकूण 10 तालुक्यातील 197 ईपीसेंटर मध्ये गोवर्गीय पशुधन लम्पी चर्म रोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. गोवर्गीय पशुधनामध्ये मर्तुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 14 सप्टेंबर रोजी बैल पोळा सणानिमित्त मोठया संख्येने गोवर्गीय पशुधन एकत्रित येत असल्याने जिल्ह्यातील इतर निरोगी पशुधनास लम्पी चर्मरोग या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या आदेशाने लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोवर्गीय पशुधनाचे बैल पोळा सणानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पशुपालक आणि शेतकरी यांनी घरगुती स्वरुपात बैल पोळा सण साजरा असे आवाहन करण्यात आले आहे
संसर्ग मोठा खबरदारी घेण्याचे आवाहन
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. लसीकरण झाल्यानंतर ही प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. याच मुळे प्रशासनाने बैल फिरवण्यासाठी बंदी केली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यापासून आजतागायत 5060 पशूंना लम्पी रोगाची लागण झाली आहे. त्यापैकी 480 पशुचा मृत्यू झाला आहे. सद्या जिल्ह्यात 786 पशुंवर लम्पी रोगामुळे उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 2,47, 776 पशूंचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहेत. ज्यावेळी लसीकरण न झालेले संसर्गापासून वाचलेली पशू हे एकत्र येत असतात. त्यावेळेस, लंपी सारखा रोग वाढण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच प्रशासन याबाबत सजग आहे. डॉ. सूर्यकांत नागरगोजे सहायक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय लातूर यांनी असे मत व्यक्त केले आहे.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण
आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्यासोबत वर्षभर शेतात राबणार्या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात.