Helmets Compulsory in Kolhapur: कोल्हापुरात उद्यापासून हेल्मेट सक्ती होणार की नाही? आरटीओ विभागाकडून खुलासा
Kolhapur: आरटीओ विभागाकडून खासगी आस्थापनांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर कोल्हापुरात उद्यापासूनच (20 मे) हेल्मेट सक्ती होणार असल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरु झाली.
Helmets Compulsory in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेटसक्ती अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भात आज (19 मे) कोल्हापूर आरटीओ विभागाकडून खासगी आस्थापनांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर कोल्हापुरात उद्यापासूनच (20 मे) हेल्मेट सक्ती होणार असल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरु झाली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना निर्णयाची माहिती दिली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती होणार नाही. तथापि, आरटीओ विभागाकडून पुढील पाच ते सात दिवस हेल्मेटसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. यानंतर दंडात्मक कारवाई निश्चित असल्याची माहिती दीपक पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
कोल्हापुरात 5 ते 7 दिवसांनी कारवाई सुरु केली जाईल
दीपक पाटील बोलताना म्हणाले की, दुचाकी चालवणाऱ्यांना व मागे बसणाऱ्यांना कायद्याने हेल्मेट सक्ती आहे. मोटर वाहन कायद्यामध्ये केलेल्या सुधारणेनुसार हेमेल्ट न घालता गाडी चालवणाऱ्याला 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे, तर मागे बसणाऱ्यालाही तेवढ्याच दंडाची तरतूद आहे. तसेच ज्या आस्थापना आहेत किंवा त्यांचे कार्यालय प्रमुख आहेत त्यांनाही 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही सरकारी आणि खासगी आस्थापना आणि महाविद्यालये असे तीन विभाग घेतले आहेत. त्यांना आम्ही आज जिल्ह्यात 250 हून अधिक नोटीस पाठवल्या आहेत. येत्या 5 ते 7 दिवसात आम्ही जिल्ह्यातील सर्वच मोठ्या आस्थापनांना नोटीस पाठवणार आहोत. त्यानंतर आम्ही 5 ते 7 दिवसांमध्ये कारवाई करणार आहे. उद्यापासून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, पण 5 ते 7 दिवसांनी कारवाई सुरु केली जाईल.
दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण सर्वाधिक
कोल्हापूर जिल्ह्यात सन 2022 व 2023 मध्ये घडलेल्या अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केले असता, एकूण रस्ते अपघातामध्ये दुचाकी व पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अपघातांमध्ये 70 ते 80 टक्के अपघात हे फक्त दुचाकी व पादचाऱ्यांचे आहेत. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय चिंताजनक आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे व बहुतांशी दुचाकी वाहनाच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे आहेत. त्यामुळे हेल्मेट वापरण्या संबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी विषयक व्यापक मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम 194 ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे.