Raju Shetti on Ravikant Tupkar : पेल्यातील वादळ पेल्यातच संपून जाईल; रविकांत तुपकरांच्या नाराजीच्या चर्चेवर राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?
Raju Shetti: राजू शेट्टी यांनी वादाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये वाद सुरु असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य नाही.
Raju Shetti on Ravikant Tupkar: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रगंली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजीवर प्रतिक्रिया देताना पेल्यातील वादळ पेल्यातच संपून जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे, राजू शेट्टी हा वाद किरकोळ आहे असं कसं काय म्हणू शकतात? अशी विचारणा रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
रविकांत तुपकरांच्या नाराजीवर राजू शेट्टी काय म्हणाले?
राजू शेट्टी यांनी वादाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये वाद सुरु असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य नाही. काही पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबुऱ्या या नेहमीच असतात. तसाच काही बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद आहे, पण तो फार महत्वाचा आहे असेही नाही. रविकांत तुपकरांची काही नाराजी असल्यास त्यांनी आपले म्हणणे मांडावे. मात्र, त्यांना शिस्तपालन समितीने त्यांना बोलावलं आहे. येत्या 8 ते 10 तारखेदरम्यान, राज्यातील जी प्रमुख नेतेमंडळी आहेत त्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये रविकांत तुपकर किंवा त्यांच्याशी वाद असणारे विदर्भ युवा आघाडीचे प्रशांत या दोघांना बोलावलं आहे. या बैठकीमध्ये समज,गैरसमज असतील दूर होतील आणि हे पेल्यातील वादळ पेल्यात संपून जाईल.
राजू शेट्टी हा वाद किरकोळ आहे असं कसं काय म्हणू शकतात?
राजू शेट्टी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर रविकांत तुपकर यांनीही आता प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी हा वाद किरकोळ आहे असं कसं काय म्हणू शकतात? अशी विचारणा तुपकरांनी केली आहे. माझा संघटनेतील कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी किंवा कार्यकर्त्यांशी वाद नाही. माझी नाराजी पक्ष नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या भूमिकेबद्दल असून मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. माझा जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील कार्यकर्त्यांशी माझा वाद नाही. विषयाचे गांभिर्य कमी करण्यासाठी कोणाशी तरी वाद आहे म्हणणे बरोबर नाही.
दरम्यान, रविकांत तुपकर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. काल (2 ऑगस्ट) बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तुपकर यांना डावलण्यात येत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेतली जात नाही, असा सूर होता. तुपकर यांनी काल बुलढाण्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. नाराजीच्या चर्चेला तुपकर यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या