(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Loksabha : कोल्हापुरातील शिंदे गटातील दोन्ही खासदार अजूनही गॅसवर, उमेदवारीवर संजय मंडलिक अन् धैर्यशील माने काय म्हणाले?
हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांनी सुद्धा उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा दावा केला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेला महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज रिंगणात उतरल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? याबाबत अजूनही संभ्रम आहे. विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली जाणार की नाही किंवा भाजप हा मतदारसंघ ताब्यात घेऊन आपला उमेदवार देणार? याबाबतही अजून चर्चा सुरूच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि काहीशी तशीच गत झालेल्या हातकणंगलेमधील खासदार धैर्यशील माने यांनी उमेदवारीवरून विश्वास व्यक्त केला आहे. दोघांनी सुद्धा उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
फोन करून कामाला लागण्याच्या सूचना
दरम्यान, संजय मंडलिक यांनी उमेदवारीसाठी बोलताना सांगितले की आज (25 मार्च) सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी कुठलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असेही त्यांनी यावेळी सांगितलं. महायुतीची उमेदवार मलाच मिळणार असा विश्वासही संजय मंडलिक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
माझं तिकीट कापले जाणार ही केवळ
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांनी सुद्धा उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा दावा केला आहे. ते म्हणाले की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माझं तिकीट कापले जाणार ही केवळ अफवा असून तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होत असल्याने उमेदवारी घोषित करण्यासाठी थोडा उशीर होत आहे. मात्र, पुढील काही तासांमध्ये उमेदवारी घोषित केली जाईल असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कमालीची रस्सीखेच सुरू आहे. कोल्हापूरची ठाकरेंची जागा काँग्रेसने आपल्या ताब्यात घेताना शाहू महाराजांना रिंगणात उतरवलं आहे, तर हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी रिंगणात असले तरी त्यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला आहे. त्यांनी दोनवेळा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आपली साथ हवी अशी साद घातली आहे. मात्र, अजूनही ठाकरे यांच्याकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमधून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार की भाजप ह्या ठिकाणी वेगळी चाल करून उमेदवार उतरवणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीसमोर कडवं आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळे महायुीकडून कोणाच्या पारड्यात मत टाकलं जातं हा सुद्धा कळीचा मुद्दा असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या