Uddhav Thackeray Meets Shahu Maharaj : उद्धव ठाकरें शाहू महाराजांच्या भेटीला; न्यू पॅलेसवर दोघांची गळाभेट, अर्धा तास कोणती चर्चा झाली?
कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शाहू महाराज यांना उमेदवारीसाठी गळ घातली होती. अखेर शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित केले.
कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (21 मार्च) करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापुरात न्यू पॅलेसवर जाऊन भेट घेतली. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. फक्त त्यांच्या नावाच्या घोषणेच्या औपचारिकता बाकी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज न्यू पॅलेसमध्ये महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले.
कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शाहू महाराज यांना उमेदवारीसाठी गळ घातली होती. अखेर शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित केले. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेला शाहू महाराज विरुद्ध महायुतीचा उमेदवार अशी असणार आहे. उद्धव ठाकरे आणि शाहू महाराज यांची जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
शिवसैनिक ताकदीने विजयी करतील
उद्धव ठाकरे शाहू महाराजांची भेट घेतल्यानंतर म्हणाले की, शाहू महाराजांना शिवसैनिक ताकदीने विजयी करतील कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. मी फक्त आत्ताच आलो असून महाराजांच्या प्रचाराला आणि विजयी सभेला सुद्धा येणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच विजयासाठी आशीर्वाद घेतल्याचे ते म्हणाले. शिवसेनाप्रमखांनंतर 1997 नंतर प्रथमच मी याठिकाणी आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराजांना पूर्ण ताकदीने विजयी करणार असल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे सांगलीसाठी रवाना
दरम्यान, या भेटीनंतर उद्धव ठाकरे सांगलीसाठी रवाना झाले. सांगली दौरा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. सांगली लोकसभेच्या जागेवरून मविआमध्ये तणाव वाढला आहे. सांगलीच्या जागेवर एकाच वेळी ठाकरे आणि काँग्रेसकडून दावा करण्यात आल्यानंतर ही जागा नेमकी कोणाकडे जाणार याचे स्पष्ट संकेत आज उद्धव ठाकरे आपल्या जनसंवाद सभेतून देणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. ठाकरे यांच्याकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारीचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत आणि ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे काँग्रेसने आजच्या जनसंवाद यात्रेवरती बहिष्कार टाकला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या