जनतेच्या कोर्टात गेल्यावर जनता उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी राहतील; खरी शिवसेना कोणाची हे निवडणुकीतून समोर येईल; अजित पवारांची प्रतिक्रिया
Ajit Pawar : उद्धव ठाकरे कदाचित सर्वोच्च न्यायालयात जातील, पण जनतेच्या कोर्टात गेल्यावर जनता उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी राहतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
Ajit Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले असले तरी उद्धव ठाकरे कदाचित सर्वोच्च न्यायालयात जातील, पण जनतेच्या कोर्टात गेल्यावर जनता उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी राहतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला. अजित पवार यांनी कागलमध्ये गैबी चौकात झालेल्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली. खरी शिवसेना कोणाची हे निवडणुकीतून समोर येईल, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी संघटना स्थापन केली. महाराष्ट्रभर पक्ष वाढवला, सभा घेऊन पक्ष सगळीकडे वाढवला. बाळासाहेब यांची भूमिका स्पष्ट होती. त्यावेळी बाळासाहेब यांनी सांगितलं होतं की मुंबई मराठी माणसाची आहे. त्यांनी बंद म्हटलं की मुंबई बंद व्हायची. पानपट्टीवर असलेला माणूस आमदार केला, वडाप चालवणारा माणूस आमदार केला. शरद पवार साहेब आणि बाळासाहेब यांची मैत्री घट्ट होती.
त्यांनी पुढे सांगितले की, बाळासाहेब यांनी सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे पक्ष सांभाळतील, आदित्य ठाकरे काम करतील. पण आता ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं गेलं. निवडणूक आयोगाने निर्णय दिला असला तरी उद्धव ठाकरे कदाचित सर्वोच्च न्यायालयात जातील, पण जनतेच्या कोर्टात गेल्यावर जनता उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी राहतील.
सत्तेत असताना तोंड बघून निधी दिला नाही
अजित पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम केलं आहे. आम्ही सत्तेत असताना तोंड बघून निधी दिला नाही, पण हे सरकार काय करत आहे, स्थगिती देण्याचं काम करत आहे. आम्ही सत्तेत आल्यावर त्यांच्या कामाला स्थगिती दिली नव्हती, पण आम्ही विरोधक आहोत म्हणून असं वागता. असं राजकारण महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं.
अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना कडक इशारा
तत्पूर्वी, अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला होता. ते म्हणाले, राज्यात झालेलं सत्तांतर सर्वसामान्य जनतेला पटलं असं वाटत नाही, पदवीधर आणि शिक्षकांनी आपला कल दिला आहे, आता आम्ही पुढच्या निवडणुकांची वाट पाहत आहोत, जनता सुद्धा निवडणुकीची वाट पाहत असल्याचा कडक इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar In Kolhapur) यांनी कोल्हापुरातून (Kolhapur News) देवेंद्र फडणवीस यांना दिला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून जनतेने सेनेचे आमदार निवडून दिले. मागेही दोनवेळा अशी भूमिका घेणाऱ्यांना जनतेने नाकारलं आहे. इजा, बिजा झाले आता तिजा होईल, अशा शब्दात अजित पवारांनी हल्ला चढवला. पुण्यातील पोटनिवडणुकीत भाजपसमोरील बटण दाबून अजित पवारांना 440 चा करंट द्या म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही त्यांनी खोचक टोला लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या