OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
नव्याने स्थापन झालेल्या राज्यातील ओबीसी बहुजन पार्टीने सुद्धा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शाहू महाराज यांनी आणखी एक एक पाऊल पुढे टाकलं आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर आता नव्याने स्थापन झालेल्या राज्यातील ओबीसी बहुजन पार्टीने सुद्धा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर लोकसभेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शाहू महाराज यांनी आणखी एक एक पाऊल पुढे टाकलं आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आज या संदर्भातील घोषणा केली.
शाहू महाराजांची कोल्हापुरात भेट घेणार
ते म्हणाले की कोल्हापूर आणि हातकणंगले संदर्भात आम्ही भूमिका घेतली आहे. त्यामध्ये कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा देत आहेत. त्यांनीच आम्हाला सर्वात आधी आरक्षण दिलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार आहोत. त्यांची भेट सुद्धा कोल्हापूरमध्ये घेणार आहोत आणि ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याने त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.
दरम्यान प्रकाश शेंडगे यांनी आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील एकत्र आल्यास तिसऱ्या आघाडीमध्ये ओबीसी बहुजन पार्टी सहभागी होणार नाही अशी सुद्धा मोठी घोषणा केली आहे. दुसरीकडे, ओबीसी आणि मराठा वाद लागल्यानंतर सातत्याने मनोज जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या छगन भुजबळ यांना नाशिकमधून उभे राहिल्यास पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितने उभे केलेल्या बुलढाणा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून ओबीसी पार्टीकडून उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत.
हातकणंगले जागेसंदर्भात सोमवारी घोषणा करणार
प्रकाश शेंडगे म्हणाले की आज आमच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आम्ही नऊ उमेदवार निश्चित केले आहेत. आघाडी करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत चर्चा सुरू असल्याचे शेंडगे यांनी सांगितले. त्यांनी सांगलीतील जागेवर आम्हाला समर्थन केल्याचेही शेंडगे यांनी सांगितले. मी स्वतः सांगली निवडणूक लढवल्यास ते पाठिंबा देणार असल्याचे यावेळी सांगितले. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत, तिथे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे असेही शेंडगे यांनी सांगितले. हातकणंगले जागेसंदर्भात आम्ही सोमवारी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शेंडगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या