Kolhapur Crime : रिल्समधील खुन्नस जीवावर बेतली, संभाजीनगरात टोळी युद्धातून तरुणाचा निर्घृण खून
Kolhapur Crime : सुजल व त्याच्या मित्रांची सोशल मीडियावरील पोस्टवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता. या वादातूनच सुजलचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील (Kolhapur Crime) संभाजीनगर परिसरात सुधाकर जोशी नगरात टोळी युद्धातून गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तलवार व एडक्याचे सपासप वार करून सुजल बाबासो कांबळे (वय 20, वारे वसाहत, कोल्हापूर) याचा आठ ते दहा जणांनी निर्घृण खून केला. मृताच्या नातेवाकांनी व मित्रांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद
सुजल व त्याच्या मित्रांची सोशल मीडियावरील पोस्टवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता. या वादातूनच सुजलचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे व त्याचे मित्र गुरुवारी दुपारी गप्पा मारत बसले होते. यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलच्या पाठीत पोटावर आणि हातावर गंभीर वार केले. तो रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला.
मित्र व नातेवाईकांची सीपीआर आवारात गर्दी
हल्ला करून संशयित पळून गेले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील सुजलला मित्रांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले. सुजलवर हल्ला झाल्याचे समजतात संभाजीनगर, वारे वसाहत येथील त्याचे मित्र व नातेवाईकांनी सीपीआर आवारात गर्दी केली. शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा सीपीआरमध्ये दाखल झाला.
इतर महत्वाच्या बातम्या