Satej Patil VIDEO : दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद... सतेज पाटील भडकले
Satej Patil VIDEO : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांची उमेदवारी शेवटच्या क्षणी मागे घेतली.
कोल्हापूर : जिल्ह्याचे काँग्रेस नेते सतेज पाटील यांना निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसकडे उमेदवारच राहिला नाही. त्यानंतर मात्र सतेज पाटील हे चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. 'दम नव्हता तर उभारायचं नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद' असं म्हणत सतेज पाटलांनी त्यांचा राग व्यक्त केला.
काँग्रेसच्या मधुरिमाराजेंचा अर्ज मागे
कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी त्यांचा अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेश लाटकर यांनी त्यांचा अर्ज मागे घ्यायला नकार दिल्यानंतर मधुरिमाराजे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासाठी मात्र हा धक्का असल्याचं समजलं जातंय.
काँग्रेसने उमेदवार बदलला
सुरूवातीला काँग्रेसने माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या नावाला अनेक नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर मात्र काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला. त्या ठिकाणी मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आता बदललेल्या उमेदवारानेच अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील मात्र चांगलेच भडकले आहेत.
राजेश लाटकर यांना पाठिंबा
काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनेच अर्ज मागे घेतल्यानंतर आता काँग्रेसकडे कोणताही उमेदवार नाही. त्यामुळे बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राजेश लाटकरांनाच पाठिंबा द्यावा लागणार आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे.
मानसिक स्थिती बरोबर नाही, मालोजीराजेंची प्रतिक्रिया
मधुरिमाराजेंनी माघार घेतल्यानंतर माजी आमदार मालोजीराजे छत्रपतींनी प्रतिक्रिया दिली. आपली मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं ते म्हणाले. मधुरिमाराजेंनी माघार नेमकी का घेतली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.
शाहू महाराज काय म्हणाले?
मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागली, राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही,ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही."