Satej Patil on BJP : कार्यकर्त्यांना मोठं गाजर दाखवावे लागते, देशपातळीवर भाजप 214 च्या वर जात नाही; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Satej Patil on BJP : कोल्हापूरमध्ये मोदी, आदित्यनाथ, अमित शाह प्रचाराला आले तरी त्याचा परिणाम पाहायला मिळणार नाही, अशा शब्दात सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
कोल्हापूर : देशपातळीवर फोडाफोडीचे पेटंट फक्त भाजपकडे आहे. भाजपने पक्ष फोडण्याचा ट्रेडमार्क घेतला आहे त्यामुळे तो दुसऱ्या कुणाला लागू होऊ शकत नाही, अशा शब्दात कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी हल्लाबोल केला. कार्यकर्त्यांना मोठं गाजर दाखवावे लागते त्याचा प्रयत्न चंद्रकांतदादा प्रामाणिकपणे करत आहेत. कोल्हापूरमध्ये मोदी, आदित्यनाथ, अमित शाह प्रचाराला आले तरी त्याचा परिणाम पाहायला मिळणार नाही, अशा शब्दात सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
कार्यकर्त्यांना मोठं गाजर दाखवावे लागते ते काम..
सतेज पाटील म्हणाले की, भाजपची बिहारमध्ये आणि दक्षिण भारतात काय अवस्था होणार? ही आकडेवारी समोर आहे. मात्र, स्वतःच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चारशे पारचा नारा द्यावा लागतो. भाजप 214 च्या वर जात नाही ही देशपातळीवरची आकडेवारी आहे. कार्यकर्त्यांना मोठं गाजर दाखवावे लागते त्याचा प्रयत्न चंद्रकांतदादा प्रामाणिकपणे करत आहेत. कोल्हापूरमध्ये मोदी, आदित्यनाथ, अमित शाह प्रचाराला आले तरी त्याचा परिणाम पाहायला मिळणार नाही.
काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स
पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूरची अस्मिता शाहू महाराजांच्या निमित्ताने दिल्लीला पाठवायची आहे. लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स झालं आहे. कोल्हापूरच्या जनतेने ठरवलं आहे खासदार बदला परिस्थिती बदलेल, खासदार बदला कोल्हापूर बदलेल हाच हट्ट कोल्हापूरकरांनी धरला आहे. आम्ही पण इथलेच आहोत आम्ही पण कोल्हापूरचेच आहोत. काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रत्येक तालुक्यात कार्यालय हा उपक्रम राबवला जात आहे. पाच वर्षात संजय मंडलिक करू शकले नाहीत म्हणून ते आता टीका करत आहेत. याच अजिंक्यताराचा रोल 2019 साली काय होता? अशी विचारणाही सतेज पाटील यांनी केली. लोकांच्या मनामध्ये महाराजांबद्दल असलेली आपुलकी आणि प्रेम ते काढू शकत नाहीत. चंद्रकांतदादा यांचा राजकारणाचा अभ्यास जास्त आहे, पुण्यात हू इज धंगेकर म्हटले होते त्याचा परिणाम पुढे पाहायला मिळाला असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी यू टर्न घेतल्यामुळे जनतेमध्ये संभ्रमावस्था
राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यावर सतेज पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी आपल्या बदललेल्या भूमिकेचे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील आश्चर्य वाटतं. राज महायुतीमध्ये जाऊन दोन-चार जागा लढवतील असं वाटलं होतं. मात्र, निवडणूकच लढवायची नाही ही भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मान्य झाली असेल असं वाटत नाही. राज ठाकरे यांच्यामध्ये इतकं का परिवर्तन झालं हे कळायला मार्ग नाही. महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण झालं त्यावेळी राज ठाकरे यांची वक्तव्य संपूर्ण जनतेने ऐकली आहेत. महाराष्ट्रातील गढूळ वातावरणाचा समाचार राज ठाकरे यांनी घेतला होता. मात्र, राज ठाकरे यांनी यू टर्न घेतल्यामुळे जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
सांगलीसह 48 जागांचा अंतिम निर्णय
जागावाटपावर बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते बसून सांगलीच्या बाबतीत खुलासा झाला आहे. भविष्यकाळात सांगलीमध्ये काँग्रेसचा सन्मान कसा राहील याबद्दल प्रयत्न केला जाणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत अशी भूमिका तिन्ही पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे सांगलीसह 48 जागांचा अंतिम निर्णय झाला आहे. सांगलीमधील नाराजी आम्ही सर्वजण एकत्र बसून दूर करु. महाराष्ट्रात तिन्ही पक्ष एकदिलाने काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या