Sangli News: शिराळा तालुक्यातील कोकरुडजवळील मांगिरी खिंडीत खासगी आरामबसला आग; प्रवाशांच्या सामानासह 50 लाखांचे नुकसान
आरामबस शिराळा तालुक्यात कराड-शेडगेवाडी राज्य मार्गवरील मांगिरी खिंडित आली असता ती पुढे चढत नसल्याने गाडीमधील निम्मे प्रवाशी खाली उतरले. शंभर मीटर पुढे घाट चढून गेल्यानंतर गाडीने अचानक पेट घेतला.
Sangli News: सांगलीमधील शिराळा तालुक्यात कोकरुडजवळ कराड-शेडगेवाडी राज्य मार्गवर मांगिरी खिंडीत खासगी आरामबसला भीषण आग लागली. या आगात बस आणि प्रवाशांच्या सामानास 50 लाखांचे नुकसान झाले. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.
रत्नागिरी येथे चायनीज, बागायत कामगार, हॉटेल, गुरखा, कपडे विक्री, तबेला कामगार, वेटर, स्वयपाक़ी यासह विविध कामासाठी आलेले 59 नेपाळी महिला पुरुष हातखंबा रत्नागिरीहून खासगी आरामबस (एमपी-41-एमएम-2727) मधून पुण्याच्या दिशेने निघाले होते. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास आरामबस शिराळा तालुक्यातील कराड-शेडगेवाडी राज्य मार्गवरील मांगिरी खिंडित आली असता ती पुढे चढत नसल्याने गाडीमधील निम्मे प्रवाशी खाली उतरल्यानंतर शंभर मीटर पुढे घाट चढून गेल्यानंतर गाडीने अचानक पेट घेतला. गाडीमधील लोक आग लागल्याने खाली उतरून आरडा ओरड करु लागले. गाडीतील प्रवाशांच्या रोख रकमेसह सर्व साहित्य, कपडे, आंबे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. अज्ञात व्यक्तीने कराड अग्निशमक दलास कळवल्यानंतर पहाटे सव्वा पाच वाजता आग विझवण्यात आली. तत्पूर्वी, गाडीतील सर्व साहित्य आणि रोख रकमा जळून खाक झाल्या होत्या.
महापालिकेच्या पथकासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, महिला 25 टक्के भाजली
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये रस्त्यावरील अतिक्रमणाचा वाद चिघळला आहे. अतिक्रमण हटवण्याठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोर महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 25 टक्के भाजली असून तिच्यावर मिरजमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सांगली जिल्ह्यातील मिरजेतील खोतनगर इथे एका कुटुंबाने रस्त्यावर अतिक्रमण केले होते. हे अतिक्रण काढण्यासाठी मिरज सुधार समितीने महापालिकेकडे तक्रार केली होती. अतिक्रमण न काढल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार महापालिकेचे पथक बुधवारी (31 मे) दुपारी अतिक्रण काढण्यासाठी गेले होते. यावेळी सुरेश वाघमारे याने महापालिकेच्या महिला कर्मचार्यांना शिवीगाळ केली. तर त्यांची आई सुमन वाघमारे यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन पेटवून घेतले. यावेळी महापालिकेच्या कर्मचार्यांनी तातडीने महिलेला लागलेली आग आटोक्यात आणली. परंतु आगीमध्ये महिला सुमारे 25 टक्के भाजली आहे. महिलेवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान आम्ही रस्त्यावर अतिक्रमण केलं नसून ती आमची जागा असल्याचा दावा वाघमारे कुटुंबाने केला आहे. तर अतिक्रमण काढण्यासाठी गेल्यानंतर आत्मदहनाचा प्रयत्न करुन शासकीय कामात अडथळा आणल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या