(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti : राजू शेट्टींच्या बळाला ठाकरेंच्या 'मशाली'ची धग; हातकणंगल्यात शेट्टी विरुद्ध माने लढाई पुन्हा रंगणार
Hatkanangale Lok Sabha Election : ठाकरे गटाच्या 17 जागांपैकी एक जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात येणार असून ते आता हातकणंगलेमधून मविआच्या माध्यमातून लढण्याची शक्यता आहे.
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीचे लोकसभेच्या 40 जागांचे वाटप (MVA Seat Sharing) जवळपास अंतिम झाल्याचं चित्र आहे. उर्वरित आठ जागांवर तिढा कायम आहे. महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या स्वाभिमानी पक्षासाठी एक जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाच्या वाट्याला येणारी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची (Hatkanangale Lok Sabha Constituency) जागा ही राजू शेट्टी यांना सोडण्यात येणार असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्येही शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात लढत असणार हे जवळपास फायनल झालं आहे.
महाविकास आघाडीकडून 40 जागांचं वाटप अंतिम झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून 17 जागा लढण्यात येणार आहेत. या 17 जागांपैकी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांच्यासाठी प्रत्येकी एक जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी यांच्यासाठी ठाकरे गट हातकणंगले लोकसभा सोडणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय.
गेल्या निवडणुकीत राजू शेट्टींचा पराभव
गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांचा 96 हजारांच्या मताधिक्यांने पराभव केला होता. त्यानंतर राज्यातील घडलेल्या सत्तासंघर्षाच्या खेळात धैर्यशील माने यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाची कास धरली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्येही फुट पडली.
हातकणंगले मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण गेल्या वेळच्या बदललेल्या राजकीय संदर्भानंतर राष्ट्रवादीच्या धैर्यशील माने यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला आणि ही जागा जिंकली.
मविआचं बळ मिळणं गरजेचं
राजू शेट्टींनी सुरूवातीला एकला चलो रे भूमिका घेतली होती. पराभव झाल्यानंतर ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले असून ऊसदर आणि दुधाच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन केलं. या काळात राजू शेट्टींनी भाजप किंवा महाविकास आघाडीसोबत न जाता एकट्याने लढावं अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे राजू शेट्टी हे कोणत्याही आघाडीत न जाता एकटे लढणार अशी चर्चा सुरू झाली.
पण मोदी लाटेला परतवून लावायचं असेल महाविकास आघाडीच्या मतांची गरज असल्याने राजू शेट्टी यांनी मधल्या काळात उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं समोर आलं. तसेच राष्ट्रवादीने ही जागा ठाकरे गटासाठी सोडल्याने ठाकरेंनाही या ठिकाणी तगड्या उमेदवाराची गरज होती. ती राजू शेट्टी यांच्या रूपाने भरून निघणार आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप
काँग्रेस - 14
ठाकरे गट - 17 (15 + 2) (यामध्ये वंचित 1 आणि स्वाभिमानीला 1 जागा)
राष्ट्रवादी काँग्रेस -9
तिढा असलेल्या जागा - 8
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची रचना कशी?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांतील 6 विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. त्यामध्ये शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, इस्लामपूर-वाळवा आणि शिराळा मतदारसंघ येतात. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार, काँग्रेसचा एक आमदार, जनसुराज्य पक्षाचा एक आमदार आणि भाजपला पाठिंबा दिलेला एक अपक्ष आणि शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलेला एक अपक्ष आमदार असं पक्षीय बलाबल आहे.
2019 सालचा निवडणूक निकाल -
- धैर्यशील माने (शिवसेना) - 5,85, 776 (46.78 %)
- राजू शेट्टी (स्वाभिमानी) - 4,89,737 (39.11%)
धैर्यशील माने - 96,039 मतांनी विजयी
ही बातमी वाचा :