(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti : लम्पी चर्मरोगापासून गाय पशुधन संरक्षणासाठी राजू शेट्टींची मुंबई उच्च न्यायालयात धाव
Lumpy Skin Disease : राज्यातील पशुधनामध्ये वेगाने फैलावत असलेल्या लम्पी चर्मरोगाने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासह जवळपास 22 हून अधिक जिल्ह्यांमध्ये या रोगाने पाय पसरला आहे.
Raju Shetti : राज्यातील पशुधनामध्ये वेगाने फैलावत असलेल्या लम्पी चर्मरोगाने (Lumpy Skin Disease) शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासह जवळपास 22 हून अधिक जिल्ह्यांमध्ये या रोगाने पाय पसरला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी तसेच अहमदनगरचे सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख, शेतकरी संपतराव पवार, सरपंच तेजस घुले पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी अॅड. असीम सरोदे, अॅड. तृणाल टोणपे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. अजिंक्य उडाणे, अॅड. अक्षय देसाई यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय विभाग, पशु संवर्धन आयुक्तालय, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था पुणे,महाराष्ट्र राज्य पशु वैद्यकीय परिषद, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे, महाराष्ट्र सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
पशु वैद्यकीय शास्त्रात BVSc झालेल्या डॉक्टरांसोबतच प्रमाणपत्र आणि डिप्लोमा घेतलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना ‘लम्पी आजार योध्ये’ म्हणून अधिकार, सुविधा आणि संरक्षण देण्यात यावे, पशु वैद्यकीय शिक्षणातील पदविका अभ्यासक्रमात आवश्यक बदल करावेत व त्यांच्या सेवा ‘लम्पी’ आजारसंदर्भातील उपाय योजनांमध्ये विचारात घेण्यात याव्यात, ‘लम्पी’ आजाराने मृत झालेल्या प्रत्येक गायी-गुरांसाठी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, ‘लम्पी’ आजाराच्या पार्श्वभूमीवर दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांचे भाव सामान्यांना परवडतील अशाप्रकारे असण्याबाबत सरकारने पावले उचलावीत, अश्या मागण्या याचिकेतून करण्यात आलेल्या आहेत.
प्राण्यांच्या दृष्टीकोनातून आरोग्य आणीबाणी
याबाबत बोलतांना याचिकाकर्ते राजू शेट्टी म्हणाले की, केवळ मोठ्या प्रमाणात पैसे किंवा भरपाई योजना जाहीर करणे हे या प्रश्नाचे उत्तर नाही. सध्याची परिस्थिती प्राण्यांच्या दृष्टीकोनातून आरोग्य आणीबाणी आहे. म्हणून सरकारने आपल्या संपूर्ण यंत्रणेला नियोजनबद्ध पद्धतीने कामाला लावणे गरजेचे आहे. परंतु खेदाची गोष्ट आहे की आजारग्रस्त गायींचे लसीकरण कसे करणार? राज्यातील सर्व पाळीव प्राण्यांना लम्पी आजारापासून वाचविण्यासाठी काय उपाययोजना आहेत व लसीकरण सार्वत्रिक कसे करण्यात येणार याबाबत सरकारचे स्पष्ट धोरणच नाही.
याचिकाकर्त्यांचे वकील असीम सरोदे म्हणाले की, भारतीय पशु वैद्यकीय कायद्याच्या कलम 30 ब च्या तरतुदीना शिथिल करून पशुवैद्यकीय शास्त्रात प्रमाणपत्र व पदविका असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची सेवा देण्यासाठी मुभा देता येऊ शकते. परंतु, सरकार अशा दूरदर्शी बाबींचा विचार करतांनाही दिसत नाही. जनावरांच्या दृष्टीकोनातून प्राणघातक असणाऱ्या ‘लम्पी’ आजारावर आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करणाऱ्या साथीच्या रोगाच्या प्रश्नावर सरकारने तत्काळ राबविण्याच्या उपाययोजना व दूरदर्शी उपाय यांचे नियोजन करण्याची गरज आहे.
इतर महत्वाच्या बातम्या