Kolhapur Rain Alert : कोल्हापूर जिल्ह्यावरील संकट कायम; 20 ऑक्टोबरपर्यंत हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाकडून कोल्हापूरसह (kolhapur Rain Alert) 9 जिल्ह्यांमध्ये 18 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणमधील पावसाचा मुक्काम वाढला आहे.
Kolhapur Rain Alert : गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार केला आहे. असे असतानाच हवामान विभागाकडून कोल्हापूरसह (kolhapur Rain Alert) 9 जिल्ह्यांमध्ये 18 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणमधील परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे. कोल्हापूर तसेच मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
परतीच्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात दैना
पावसाने चालू मोसमात जून महिन्याचा अपवाद वगळता चांगली साथ दिली होती. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नव्हती. त्यामुळे शिवारातील पीके जोमात आली होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने कोल्हापूर शहर परिसराह जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने उभ्या पिकांची पार नासाडी झाली आहे. या पावसाचा फटका सर्वाधिक सोयाबीन पिकाला बसला आहे. सोयाबीन पीक पोसले असतानाच परतीच्या पावसाने दणका दिल्याने त्याला मोड येऊ लागली आहेत.
जिल्ह्यात 78 गावांमध्ये पिकांची नासाडी
कोल्हापूर जिल्ह्यात सलग तीन दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल 78 गावांमधील 989 हेक्टरमधील भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी भुईमूग आणि सोयाबीनला कोंब येण्याची भीती आहे. दुसरीकडे पोसलेलं भात पीक झोपल्यानं अनेक बळीराजांचा तोंडचा घास हिरावला गेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस
ऑक्टोबर महिना कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या ठिकाणी पाऊस कमी होणे अपेक्षित असताना तब्बल 129.2 मिमी पाऊस झाला. विशेष आजवरची आकडेवारी पाहिल्यास हाच पाऊस 60 मिमीच्या वर पडत नव्हता.
गगनबावडा, शिरोळ, पन्हाळा, हातकणंगले तालुक्यात कहर
दरम्यान, परतीच्या पावसाने सर्वाधिक कहर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये झाला. यामध्ये गगनबावडा, पन्हाळा, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांचा समावेश आहे. गगनबावडा तालुक्यात 282.9 मिमी पाऊस झाला. हातकणंगले तालुक्यात 205 मिमी पाऊस झाला. शिरोळमध्ये 143.9 मिमी पाऊस झाला. पन्हाळा तालुक्यात 163.4 मिमी पाऊस झाला.
इतर महत्वाच्या बातम्या