(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Shivsena : उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, निष्ठा यात्रेतून कोल्हापुरात शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून निष्ठा यात्रा काढण्यात आली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आम्ही कमी नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
Kolhapur Shivsena : शिवसेनेमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज 62 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांचा वाढदिवस शिवसैनिकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाळासाहेबांच्या माघारी शिवसेना समर्थपणे सांभाळणारे उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मोठे आव्हान ठाकले आहे. संकटात असलेल्या उद्धव ठाकरे यांना प्रेम दाखवून देण्यासाठी शिवसैनिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे.
कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून निष्ठा यात्रा काढण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले शक्तीप्रदर्शन करत नेते जरी बाजूला झाले असले तरी आम्ही लढण्यासाठी कमी नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांसह महिलांचाही उस्फूर्तपणे निष्ठा यात्रेत सहभाग दिसून आला. फटाक्यांची आतषबाजी तसेच शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी शिवसैनिकांनी यावेळी परिसर दणाणून सोडला. दसरा चौकातून प्रारंभ झाला. यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या. शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले व सुनील मोदी यांनी रॅलीचे नेतृत्व केले.
आदित्य ठाकरे एक ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर
दरम्यान, आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढताना थेट बंडखोरांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेत असल्याने त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आदित्य ठाकरे कोकणात जाणार आहेत. तेथील दौरा पूर्ण करून ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत.
1 ऑगस्टला संध्याकाळी आदित्य ठाकरे कोल्हापुरात दाखल होतील. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी निश्चित होणार असल्याची माहिती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमध्ये ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला अभूतपूर्व भगदाड पडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेही शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. माजी आमदार राजेश क्षीरसागर हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माजी शिवसेना आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर हेसुद्धा शिंदे त्यांच्यासोबत दिसल्याने ते सुद्धा बंडखोरी करणार का? याची चर्चा रंगली आहे.