ज्या ‘महाशक्ती’ने प्रचंड त्रास दिला, त्यांच्याच मांडीला मांडी; शाहूंचा, कोल्हापूरचा वारसा कसा विसरलात? रोहित पवारांचा हसन मुश्रीफांना थेट सवाल
महाशक्तीच्या मांडीला मांडी लावून तुमच्यासारखी व्यक्ती जाऊन बसते, तेव्हा राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा आपण कसा विसरलात, असा प्रश्न पडतो. अशा शब्दात रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
Rohit Pawar on Hasan Mushrif: राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत सावलीप्रमाणे असलेल्या कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांच्या वळचणीला गेल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत. ईडीच्या चौकशीने हैराण झालेल्या हसन मुश्रीफ यांनी राजकीय अगतिकतेतून पलटी मारली, तरी त्यांनी घेतलेल्या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यात नाराजी आहे. आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या नेत्यांना आतापर्यंत पक्षाकडून देण्यात आलेल्या सन्मानाचा पाढा वाचत आहेत. आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या हसन मुश्रीफ यांना थेट सवाल केला आहे.
कोल्हापूरकरांचा आणि शाहू महाराजांचा वैचारीक वारसा आपण कसा विसरला?
रोहित पवार यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मुश्रीफ साहेब... आदरणीय पवार साहेबांची साथ-मार्गदर्शन आणि आपली मेहनत यांच्या बळावर आपण कोल्हापूरमध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वधर्म समभाव जोपासत काम करत होतात. पण ज्या 'महाशक्ती'ने त्यांच्या ताब्यातील यंत्रणांचा गैरवापर करत तुम्हाला प्रचंड त्रास दिला. धार्मिक सलोखा उध्वस्त करुन तेढ निर्माण करायची आणि सत्ता मिळवायची, हेच ज्यांचं धोरण आहे. अशा शक्तीच्या मांडीला मांडी लावून तुमच्यासारखी व्यक्ती जाऊन बसते तेव्हा कोल्हापूरकरांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा वैचारीक वारसा आपण कसा विसरलात, असा प्रश्न पडतो.
मा. मुश्रीफ साहेब.. आदरणीय पवार साहेबांची साथ-मार्गदर्शन आणि आपली मेहनत याच्या बळावर आपण कोल्हापूरमध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वधर्म समभाव जोपासत काम करत होतात. पण ज्या ‘महाशक्ती’ने त्यांच्या ताब्यातील यंत्रणांचा गैरवापर करत तुम्हाला प्रचंड त्रास दिला.. धार्मिक सलोखा उद्धस्त करुन… pic.twitter.com/3x3exOW3xD
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 7, 2023
मुश्रीफांची ईडीकडून सुटका झाली?
ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मुश्रीफ यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.
मात्र, हसन मुश्रीफांना हायकोर्टाचा दिलासा कायम आहे. 22 ऑगस्टच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे तपासयंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. मार्च महिन्यात अपेक्षित असलेला तपास अहवाल पुढील सुनावणीपूर्वी सादर करत तपास अधिकाऱ्यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दुसरीकडे, हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांनाही 19 जुलैपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात ईडी मनी लाँड्रींग प्रकरणी चौकशी करत आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी हसन मुश्रीफांची मुलं जावेद, आबिद आणि नाविद यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे. त्यामुळे शरद पवार यांनी ईडीच्या रडारवर असलेल्या नेत्यांची यादी वाचताना दोन नंबरला हसन मुश्रीफ यांचा उल्लेख केला होता. ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर तीनवेळा ईडीकडून छापेमारी झाली आहे. मुश्रीफांविरोधात कोल्हापूर आणि मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या विरोधात 108 तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकरणांचा तपास कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :