मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आज कोल्हापुरात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागताची तयारी
दुपारी बाराच्या सुमारास मुश्रीफ यांचे कोल्हापूर शहरात ताराराणी चौकात आगमन होईल. याठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केलं जाणार आहे. तेथून ते रॅलीने ते दसरा चौकातील शाहू महाराज पुतळ्याला अभिवादन करतील.
Hasan Mushrif: कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आज (7 जुलै) कोल्हापुरात येत आहेत. मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर समरजित घाटगे यांनीही दंड थोपटले आहेत. त्यांनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने मुश्रीफ यांच्या जोरदार स्वागताची तयारी करण्यात आली आहे. मुश्रीफ यांच्या स्वागताच्या नियोजनासाठी अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हा बँकेत गुरुवारी पार पडली.
अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी, मंत्री मुश्रीफ यांनी तीस-पस्तीस वर्षांत लोकाभिमुख समाजकारण केले आहे. त्यांना ताकद देऊया आणि त्यांचे नेतृत्व वाढवुया, असे आवाहन केले. यावेळी बैठकीला केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने, कोल्हापूर महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भरत पाटील-भुयेकर, उपाध्यक्ष शंकर पाटील, संचालक बी. जी. पाटील, माजी नगरसेवक रमेश पोवार, ॲड. प्रकाश देसाई, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर-खेबवडे, शिरीष देसाई यांची भाषणे झाली.
ताराराणी चौकात आगमन होणार
दरम्यान, आज दुपारी बाराच्या सुमारास मुश्रीफ यांचे कोल्हापूर शहरात ताराराणी चौकात आगमन होईल. याठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केलं जाणार आहे. तेथून ते रॅलीने ते दसरा चौकातील शाहू महाराज पुतळ्याला अभिवादन करतील. तेथून राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून शिवाजी पुतळ्यास अभिवादन करुन बिंदू चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. तेथून अंबाबाई मंदिरात दर्शन घेवून ही रॅली कागलला रवाना होणार आहे. कागलमध्ये सायंकाळी चार वाजता सभा होणार आहे. मंत्री झाल्यानंतर मुश्रीफ पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने ठिकठिकाणी स्वागत कमानी व होर्डिंग उभारली जाणार आहेत.
थोड्याच दिवसात पत्रकार परिषद घेणार
दुसरीकडे, ईडीचा ससेमीरा टाळण्यासाठी अजित पवारांसोबत गेलेल्या कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांचा स्थानिक राजकारणातून गुंता कमी होण्याऐवजी वाढण्याचीच जास्त चिन्हे आहेत. मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले होते. त्यांन आज कागलमध्ये मेळावा घेत भाजपसोबत राहणार असल्याचा निर्धार करत मुश्रीफांविरोधात पुन्हा दंड थोपटले आहेत. त्यामुळे कागलच्या पुन्हा गटातटाच्या राजकारणात राजकीय संघर्ष अटळ असल्याची चिन्हे आहेत.
मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे.मुश्रीफांवर गेल्या सहा महिन्यांमध्ये तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. जिल्हा बँकेवरही छापेमारी झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने मुश्रीफांवर आरोप केले आहेत. त्यांनी कारखाना कार्यस्थळाला भेट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय राडा झाला होता. सोमय्या कोल्हापुरात आल्यानंतर मुश्रीफांनी तोफ डागल्यानंतर घाटगे यांनी एकवेळ किरीट सोमय्या परवडेल, पण मी परवडणार नाही असं म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना आज विचारण्यात आले असता मुश्रीफांवरील आरोपांबाबत थोड्याच दिवसात पत्रकार परिषद घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळूनही मुश्रीफ आणि घाटगे गटातील राजकीय संघर्ष वाढणारच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :