Maharashtra Vidhan Sabha Election : सीएम शिंदेंना पाठिंबा दिलेल्या महायुतीमधील सहयोगी आमदाराच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता! कोणत्या जिल्ह्यात टेन्शन वाढणार?
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ते शाहू विकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर आमदार राजेंद्र पाटील यांनी शिंदे यांनी पाठिंबा दिला होता. गुवाहाटीला ते सुद्धा गेले होते. त्यामुळे महायुतीचे सहयोगी आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून निवडणुकीत सवता सुभा होणार का? याची सुद्धा चर्चा रंगली आहे.
शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू विकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शाहू विकास आघाडी पक्षाला विधानसभेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये टेन्शन
कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून चार जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघासह करवीर आणि हातकणंगले मतदारसंघावर दावा केला आहे. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याच पक्षाकडून शड्डू ठोकला आहे. सहयोगी आमदारांनी केलेल्या दाव्याने महायुतीला या जागांवर उमेदवार देताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विद्यमान उमेदवारांना पाठिंबा निश्चित केल्यास इच्छुकांना सुद्धा सांभाळण्याचं काम करावे लागणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सहयोगी आमदारांनी घेतलेल्या भूमिकेनं चांगलीच कसरत होण्याची शक्यता आहे.
भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाने इचलकरंजीतून राहुल आवाडे व हातकणंगलेतून जयश्री कुरणे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे भाजपचे सहयोगी आमदार आहेत. ते स्वतः पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातून निवडणुकीच्यटा रिगणात असतील. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर असतील. विनय कोरे यांनी जनसुराज्यकडून करवीर मतदारसंघातून संताजी घोरपडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके इच्छूक आहेत. त्यामुळे आवाडे आणि कोरे यांनी जाहीर केलेल्या उमेदवारानंतर आता यड्रावकर यांचाही पक्ष आल्याने आणखी एका मतदारसंंघात डोकेदुखी वाढली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या