Kolhapur Crime : कोल्हापुरात दोन दुकानांतून नॉयलॉन, सिंथेटिक धाग्याच्या 12 रिंगी जप्त; परवाना काढून घेण्याची कार्यवाही सुरु
Kolhapur Crime : कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य व परवाना विभागाने संयुक्त कारवाई करताना पान लाईनमधील मुन्ना पतंग डेपो व राजू पतंग डेपोतून नॉयलॉन, सिंथेटिक धाग्याच्या 12 रिंगी जप्त केल्या.

Kolhapur Crime : कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य व परवाना विभागाने संयुक्त कारवाई करताना पान लाईनमधील मुन्ना पतंग डेपो व राजू पतंग डेपोतून नॉयलॉन, सिंथेटिक धाग्याच्या 12 रिंग (Nylon manja) जप्त केल्या. संबंधित व्यावसायिकांचा परवाना निलंबित करण्याची कार्यवाही परवाना विभागाकडून प्रस्तावित करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोणीही नायलॉन मांजाची खरेदी अथवा विक्री करु नये, नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कारवाईसाठी तीन पथके तयार केली आहेत.
या पथकांमार्फत नॉयलॉन, सिंथेटिक धागा साठा व विक्री करत असलेल्या व्यावसायिकांची तपासणी करण्यात येत आहे. यातून या दोन दुकानात बंदी असलेला मांजाचा साठा असून, ते विक्री करत असल्याचे आढळले. त्यांच्यावर कारवाई करत नॉयलॉन, सिंथेटिक धाग्याच्या 12 रिंगी (Nylon manja) जप्त केल्या. उपायुक्त शिल्पा दरेकर, परवाना अधीक्षक रामचंद्र काटकर व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. आरोग्य निरीक्षक मनोज लोट, परवाना निरीक्षक बाळासाहेब जाधव, शकील पठाण यांनी कारवाई केली.
दरम्यान, मकर संक्रांत सणादरम्यान मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात. पतंगासाठी नायलॉन मांजाचा वापर होण्याची शक्यता आहे. तथापी, नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी आणि मानवास होणारी इजा, तसेच पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी नागरिकांनी नायलॉन मांजाची खरेदी करु नये, असे आवाहन शिंदे यांनी केले. नायलॉन मांजा विक्री होत नसल्याची खात्री करण्यासाठी पथके स्थापन करुन दुकानांची तपासणी करा, मांजा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करा, अशा मांजाच्या खरेदी, विक्री, वापर व वाहतूकीवर निर्बंध आणा. शाळा, महाविद्यालये तसेच नागरिकांमध्ये याबाबत जाणीवजागृती करा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
नायलॉन मांजाविरोधात राज्यभर कारवाई
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नायलॉन मांजाची विक्री आणि साठा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी गुरुवारी एक आदेश जारी करून नायलॉन वापर, विक्री आणि साठवणूक करण्यास बंदी घातली आहे. पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणार्या नायलॉनला बळकट करण्यासाठी त्यावर काही वेळा काचेची पावडर टाकली जाते, त्यामुळे पक्षी गंभीर जखमी होतात. अनेक घटनांमध्ये जिवितहानी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या






















