(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांनी केलेल्या दाव्यानंतर राजू शेट्टींकडून स्पष्ट खुलासा; संजय राऊतांनी संपर्क साधला का? यावरही बोलले!
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संवाद असतोच आणि ते सोबत येतील असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Raju Shetti on Chandrakant Patil : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chadrakant patil) यांनी कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याशी संवाद असतोच आणि ते सोबत येतील असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दाव्यानंतर राजू शेट्टी यांनी दावा खोडून काढला. राजू शेट्टी यांनी स्वतः एबीपी माझाशी बोलताना खुलासा केला.
राजू शेट्टी यांनी बोलताना सांगितले की, अशा कोणत्याही प्रकारची चर्चा चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अथवा भाजपशी झालेली नाही. ते म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील आणि माझा अखेरचा संवाद हा नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर असताना घरी आल्यानंतर झाला होता. ही भेट केवळ मित्रत्वाच्या पातळीवर होती. कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. आमची भूमिका एकला चलो रे हीच कायम असून महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यांच्याशी कोणत्याही प्रकारे सोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही एकला चलो रे हीच भूमिका कायम ठेवू असेही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
संजय राऊतांच्या दौऱ्यावरही बोलले
दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा नुकताच कोल्हापूर दौरा पार पडला. याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता संजय राऊतांशी कोल्हापूर दौऱ्यात कोणत्याही प्रकारची बोलणी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर होते, त्यावेळी आपण शाहुवाडी दौऱ्यावर होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे बोलणं झालं नसल्याचं राजू शेट्टी म्हणाले. हातकणंगले मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी आपण सहयोगी उमेदवार किंवा शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा घेणार का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची राजू शेट्टी यांनी हवा काढून घेतली आहे. विधानसभेला आमची ज्या ठिकाणी ताकत असेल, तिथे उमेदवार देण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी नमूद केले.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
चंद्रकांत पाटील कोल्हापुरात बोलताना म्हणाले होते की, 'रासप' आमच्या सोबत आहे, 'स्वाभिमानी'ही होती. मध्यंतरीच्या काळात ते बाजूला गेले, तरीही राजू शेट्टी यांच्याशी आमचा संवाद असतोच. राजू शेट्टी सोबत येतील, याचा मला विश्वास आहे पाटील यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या