Hasan Mushrif v/s Samarjeetsinh Ghatge : कुठल्या बिळात लपलात, वाघाचं काळीज असेल तर बिळातून बाहेर या; समरजित घाटगेंकडून हसन मुश्रीफांना थेट आव्हान
Hasan Mushrif v/s Samarjeetsinh Ghatge : गेल्या काही महिन्यांपासून आमदार हसन मुश्रीफ आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे.
Hasan Mushrif v/s Samarjeetsinh Ghatge : भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्याकडून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरुच आहेत. कुठल्या बिळात लपलात, वाघाचं काळीज असेल तर बिळातून बाहेर या, असे म्हणत त्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना पुन्हा एकदा थेट आव्हान दिलं आहे. कागल तालुक्यातील सावर्डे खुर्दमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमात त्यांनी मुश्रीफांवर तोफ डागली. समरजित यांच्याकडून आव्हानाची भाषा झाल्याने पुन्हा एकदा वादामध्ये ठिणगी पडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमदार हसन मुश्रीफ आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे.
40 कोटी रुपये गेले कोठे?
समरजित घाटगे म्हणाले की, 40 हजार शेतकऱ्यांनी 40 कोटी रुपये मुश्रीफ यांच्याकडे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या शेअर्सपोटी दिले. शेतकऱ्यांचे शेअर्सचे पैसे कारखान्याच्या बँक खात्याच्या तपशिलात दिसत नाहीत. दहा दिवसांपूर्वी मुश्रीफांना हे पैसे कुठे गेले? असा प्रश्न विचारला होता. याबाबतीत ते काहीच बोलत नाहीत. मुश्रीफांनी ‘संताजी’च्या सभासद शेतकऱ्यांना उत्तर द्यावे. 40 कोटी रुपये गेले कोठे?
त्यांनी पुढे सांगितले की, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना 40 हजार शेतकऱ्यांचा असल्याचे सांगतात. त्यांच्या आवाहनानुसार 40 हजार शेतकऱ्यांनी विश्वासाने शेअर्ससाठी 40 कोटी रुपये दिले. हे शेतकरी या कारखान्याला सभासदच नाहीत. उलट मुश्रीफ यांच्या कुटुंबातील व्यक्ती व काही कंपन्याच या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये आहेत. ज्या विश्वासाने शेतकऱ्यांनी त्यांना शेअर्सपोटी इतकी मोठी रक्कम दिली. त्या 40 हजार शेतकऱ्यांचा त्यांनी विश्वासघातच केला आहे.
मुश्रीफांची गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव
दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडी प्रकरणात गोवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे. याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई तसेच आरोपपत्र दाखल करू न देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. मुश्रीफांविरोधात 40 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करत 23 फेब्रुवारी रोजी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक कुलकर्णी यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. हे आपल्याविरोधातील षड्यंत्र असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवरून ईडी प्रकरणात अडकवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या