कर्तव्यदक्ष शिवराज नाईकवाडेंना का हटवलं? कोल्हापूरकरांनी पालकमंत्री दीपक केसरकरांना घेराव घालून केला सवाल; जिल्हाधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप
Kolhapur News : कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला एका रात्रीत हटवण्यामागे कारण तरी काय? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. कोल्हापूरकरांनी जिल्हाधिकारी हे मनमानी करत असल्याचा आरोप केसरकर यांच्यासमोर केला.
Kolhapur News : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना तडकाफडकी पदमुक्त केल्यानंतर कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे. याचा प्रत्यय आज खुद्द कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना आला. सचिव पदावरून शिवराज नाईकवाडे यांना का हटवण्यात आलं? असा सवाल कोल्हापूरकरांनी आज दीपक केसरकर यांना अंबाबाई मंदिर परिसरात विचारला. दरम्यान, कोल्हापुरात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
चोर सोडून संन्यासाला फाशी कशासाठी देता?
नाईकवाडे यांना का हटवण्यात आलं? अशी विचारणा कोल्हापूरकरांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. पालकमंत्री केसरकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते आज सकाळी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात पोहोचले असता यावेळी त्यांना कोल्हापूरकरांनी घेराव घातला. यावेळी चोर सोडून संन्यासाला फाशी कशासाठी देता? अशी विचारणा कोल्हापूरकरांनी केसरकर यांना केली. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला एका रात्रीत हटवण्यामागे कारण तरी काय? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. याचवेळी कोल्हापूरकरांनी जिल्हाधिकारी हे मनमानी करत असल्याचा आरोप केसरकर यांच्यासमोर केला.
गेल्या काही दिवसांपासून अंबाबाई मंदिरातील मूर्तीची नाजूक स्थितीवरून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच अनुषंगाने काही मीडियामधून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच अंबाबाई मंदिरात मीडियाला कॅमेरा घेऊन बंदीचा फतवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. TRP साठी बातम्या दाखवल्या जात असल्याचा अजब आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. त्या संदर्भात माध्यमांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना विचारले असता त्यांनी या संदर्भात प्रशासकच बोलू शकतात अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे सचिवांनी घेतलेली भूमिका जिल्हाधिकाऱ्यांना खटकली असावी, अशीही चर्चा कोल्हापूरमध्ये रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीच्या स्थितीवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात राज्य आणि केंद्राच्या पुरातत्त्व विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. याच प्रकरणावरून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात श्री पुजकांकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर सचिवांचा पदभार तडकाफडकी काढून घेत अंबाबाई मंदिरातील मूळ मुद्यांकडे दुर्लक्ष करण्याचा डोळेझाक करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :