Kolhapur News : कोल्हापुरातील महालक्ष्मी महाउत्सवची चौकशी होणार; मनपा प्रशासनाकडून गंभीर दखल
कोल्हापुरात सध्या श्री कोल्हापूर महालक्ष्मी महाउत्सव नावाचे होर्डिंग्स झळकत आहेत. या होर्डिंग्जवर विविध आजारांवर दिव्य मंत्रांनी दैविक प्रार्थना करण्यात येणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
![Kolhapur News : कोल्हापुरातील महालक्ष्मी महाउत्सवची चौकशी होणार; मनपा प्रशासनाकडून गंभीर दखल Mahalakshmi Mahautsav in Kolhapur will be investigated Serious notice from Kolhapur Municipal Corporation Kolhapur News : कोल्हापुरातील महालक्ष्मी महाउत्सवची चौकशी होणार; मनपा प्रशासनाकडून गंभीर दखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/426aa89fd35d34d34793841025ad2e9c1676545484279444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur : कोल्हापुरात (Kolhapur News) सध्या श्री कोल्हापूर महालक्ष्मी महाउत्सव नावाचे होर्डिंग्स झळकत आहेत. या होर्डिंग्जवर विविध आजारांवर दिव्य मंत्रांनी दैविक प्रार्थना करण्यात येणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे. कार्यक्रमाची परवानगी घेत असताना अशा पद्धतीचे कोणतेही कागदपत्रे जमा केली नाहीत, त्यामुळे आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमावर कारवाई होऊ शकते, अशा पद्धतीचा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेनं दिला आहे.
26 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान कोल्हापुरात (Kolhapur) महालक्ष्मी महाउत्सव कार्यक्रम होणार आहे. श्री कृष्णगिरी पार्श्व पद्मावती सेवा ट्रस्ट महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने हा महाउत्सव आयोजित केला आहे. मात्र, हा महाउत्सव आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मंत्रोच्चाराने विविध आजारांवर उपचार करण्याचा दावा या होर्डिंगवर करण्यात आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली आहे.
होर्डिंग्जवर, श्री कोल्हापूर महालक्ष्मी असा उल्लेख केल्याने अनेक भाविक कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संपर्क करून या कार्यक्रमाची माहिती विचारत आहेत. मात्र, या कार्यक्रमाची अंबाबाई मंदिर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कोणताही संबंध नाही. केवळ नावात साम्यता ठेवून अशा पद्धतीच्या इतर संस्था हे कार्यक्रम करत असल्याचं देवस्थान समितीकडून सांगण्यात आले. इतकंच नाही तर संबंधितांवर देवस्थान समितीच्या विधीज्ञांशी बोलून कायदेशीर कारवाईबाबत देखील विचार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा काहीही संबंध नाही
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे अनेक भाविक या महाउत्सवाबाबत विचारणा करत आहेत. मात्र, या कार्यक्रमाचा आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कोणताही संबंध नाही असे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेकडून दखल
दरम्यान, श्री महालक्ष्मी कोल्हापूर महाउत्सव या कार्यक्रमावर कोल्हापूर महानगरपालिकेने आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये मंत्रोच्चाराच्या सहाय्याने आजार बरे केले जातील असे दाखवण्यात आलं आहे. ही शास्त्रीय पद्धत नसून यामुळे चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरू शकतात. कार्यक्रमाची परवानगी घेत असताना अशा पद्धतीचे कोणतेही कागदपत्रे जमा केली नाहीत, त्यामुळे आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमावर कारवाई होऊ शकते, अशा पद्धतीचा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेनं दिला आहे.
कोल्हापुरात होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि इतर संस्थांमधून आता 'श्री कोल्हापूर महालक्ष्मी' या नावावरून वाद निर्माण होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)