आजपासून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला सुरुवात, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती
मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ही आठवड्यातून तीन दिवस असणार आहे.या विमानसेवेमुळे कोल्हापूर- मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
मुंबई : बहुप्रतिक्षित कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा (Kolhapur Mumbai Airliance) प्रारंभ आजपासून होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थितीत राहणार आहेत. ही सेवा संजय घोडावत यांच्या ‘स्टार एअरवेज’ कंपनीकडून सुरू केली जात आहे.
मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ही आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. आठवड्यातील मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी ही विमानसेवा असणार आहे. कोल्हापूर ते मुंबईसाठी 2 हजार 573 रुपये इतका तिकीट दर असणार आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर- मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
विमान मुंबई विमानतळावरून 10.30 वाजता उड्डाण करेल आणि कोल्हापुरात 11.20 मिनिटानी कोल्हापुरात पोहचणार आहे. अवघ्या 40 मिनिटाचा हा प्रवास असणार आहे. तर कोल्हापुरातून सकाळी 11.50 वाजता उड्डाण करणार आणि मुंबईत 12.45 वाजता पोहचणार आहे. कोल्हापूर - मुंबई मार्गावर विमानसेवा सुरु व्हावी, अशी प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी होती.
कोल्हापूर मुंबई विमानसेवा कोरोना काळात बंद करण्यात आली. कोल्हापूर मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता. पण कंपनीने अचानक ही सेवा बंद केली होती. त्यानंतर सेवा सुरू व्हावी अशी प्रवाशाची अनेक दिवसांपासून मागणी होती. अखेर या मागणीला यश मिळाले.
कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना ही सेवा सोयीची ठरणार आहे. सध्या कोल्हापूरातून तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाग, हैदराबाद या शहरात सध्या विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.