Kolhapur Shiv Sena: आदित्य ठाकरेंचं बोलणं जिव्हारी लागलं, कोल्हापूरमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने थेट राजीनामा टाकला
आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया जिव्हारी लागल्याचे सांगत हर्षेल सुर्वे यांनी पदाचा आणि सक्रिय सभासदाचा राजीनामा दिला आहे. अस्तित्वासाठी संघर्ष सुरु असतानाच पदाधिकाऱ्यांचे नाराजीनाट्य सुरुच आहे.

Kolhapur Shivsena: कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटामध्ये अंतर्गत कलह सुरूच आहे. पदाधिकाऱ्यांमधील सुंदोपसुंदी चर्चेचा विषय ठरला असतानाच जिल्हाप्रमुखपदी रवीकिरण इंगवले यांची निवड होताच शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इंगवले यांच्या पदाला विरोध करत असताना सुर्वे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या नाराजीनंतर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी निर्णय मान्य नसेल तर निघून गेलं तरी चालेल, अशी प्रतिक्रिया दिली होती. आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया जिव्हारी लागल्याचे हर्षेल सुर्वे यांनी सांगत पदाचा आणि सक्रिय सभासदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरु असतानाच पदाधिकाऱ्यांचे नाराजीनाट्य सुरुच आहे.
आदित्य साहेबांची प्रतिक्रिया जिव्हारी लागली
हर्षल सुर्वे यांनी सांगितले की माझी जिल्हाप्रमुखपदी निवडणूक झाल्याने मनातील खदखद व्यक्त केली होती. मात्र, आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली ती जास्त जिव्हारी लागल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत आम्ही आदेश मानून काम केले होते. कधी आदेश डावलला गेला नाही, निर्णय मान्य नसेल तर निघून जावा, असे साहेब म्हणाले. मला निर्णय मान्य नाही, त्यामुळे साहेबांचा आदेश म्हणून पक्षातून निघून जात असल्याचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले. त्यामुळे हर्षल सूर्वे आता शिवसेना शिंदे गटाचा मार्ग निवडणार का? याकडे लक्ष असेल. दुसरीकडे, शिवसेना उपनेते संजय पवार आणि रविकिरण इंगवले यांच्यामध्येही संवाद नसल्याने संजय पवार सुद्धा भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे संजय पवार सुद्धा काही निर्णय घेणार का? याकडे लक्ष असेल.
विधानसभा निवडणुकीसाठी रवीकरण इंगवले आणि संजय पवार हे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने हा मतदारसंघ कोणाकडे जाणार याचीचर्चा रंगली होती. मात्र मतदारसंघाची चर्चा सुरू असतानाच रविकिरण इंगवले आणि संजय पवार यांची मात्र एकमेकांवर कुरघोडी सुरू होती. इतकेच नव्हे तर या वादाचा एक ऑडिओ कॉल सुद्धा व्हायरल झाला होता. पक्ष अडचणीत असताना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. असं असतानाही संजय पवार चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचे रविकिरण यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे आता इंगवले जिल्हाप्रमुख झाल्याने संजय पवार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या























