Kolhapur Worst Road : खड्ड्यात गेलेल्या कोल्हापुरातील संभाजीनगर ते नंगीवली चौक झाला 'मृत्यूचा सापळा'!
कोल्हापूर शहरातील रस्ते दिवसागणिक प्रवास करण्यासाठी भयावह आणि मृत्यूला आमंत्रण देणारे होत चालले आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी घरात मुलाबाळांमध्ये येऊ की नाही? याची श्वाश्वती देता येत नाही.
Kolhapur Worst Road : कोल्हापूर शहरातील रस्ते दिवसागणिक प्रवास करण्यासाठी भयावह आणि मृत्यूला थेट आमंत्रण देणारे होत चालले आहेत. सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी घरात मुलाबाळांमध्ये येऊ की नाही? याची श्वाश्वती देता येत नाही. संभाजीनगरपासून ते नंगीवली चौकापर्यंतच्या रस्त्यावर पसरलेली दगडाची खडी आणि त्यामधील खड्डे पाहता साक्षात मृत्यूच्या मार्गावरून जात आहोत, असेच काही काळ वाटल्यास नवल वाटणार नाही.
महापालिकेचा निषेध म्हणून संभाजीनगर ते नंगीवली चौक या भयावह रस्त्यावरील खडड्यांना थेट श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आम आदमी पक्षाकडून करण्यात आला. गेले काही दिवस कोल्हापूर महानगरपालिकेकडून पॅचवर्क काम चालू आहे, पण ते कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाकडून नंगिवली चौक ते संभाजीनगर रोडवर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रशासनाला जागं करण्याचे काम करण्यात आले.
आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मयुर भोसले म्हणाले, गणेशोत्सवापासून या रोडवर पॅचवर्कचे काम सुरु आहे. खडी आणून टाकलेली आहे, पण काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे या मार्गावरील खड्ड्यांना आम्ही श्रद्धांजली वाहिली. रवि शिंदे म्हणाले, चौकाचौकांमध्ये खड्ड्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना कर देऊनही सेवा मिळत नाहीत. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. कोल्हापूरच्या रोडवर त्वरित काम सुरु करावे, अशी मागणी त्यांनी केली.
पावसाच्या पाण्याने महापालिकेचे डांबर वाहून जाते आणि सहा महिन्यांनी नवीन कोटेशन काढले जाते, असा आरोप आम आदमी पक्षाने केला. या अधिकाऱ्यांचे खाली डोके वर पाय करण्याची वेळ आल्याचेही आम आदमी पक्षाने म्हटले आहे. सारस्वत बँकेपासून ते नंगीवली चौकापर्यंत दगडाची उखडली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक भयावह आहे.
रेसकोर्स नाक्यापासून पंधरा दिवसांच्या आत उखडला
रेसकोर्स नाक्यापासून करण्यात आलेला रोडवर अवघ्या 15 दिवसांच्या आत खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ते करत आहेत की चेष्टा करत आहेत हे समजण्यास मार्ग नाही. शहरातील खड्ड्यांमुळे दररोज अनेक अपघातही घडत आहेत. शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे व्यथा मांडूनही रस्त्यांमध्ये सुधारणा झालेली नाही. दुर्दैवाचा फेरा म्हणजे पाऊस पडल्यानंतर कोल्हापूर अनेक सखल भाग तुंबून जातात. त्यामुळे तुंबलेल्या पाण्यातून आणि महाकाय खड्डे यातून वाट काढत घर गाठावे लागते. गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर शहराला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे वाहतूकदारांची पार दैना झाली. चांगले रस्ते कोल्हापूरकरांच्या नशिबीच नाहीत का? असाच काहीसा प्रश्न पडत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या