Kolhapur Rain Update: राऊतवाडी, बर्की धबधब्याकडे जात आहात? मग बातमी नक्की वाचा...
कोल्हापूर जिल्ह्यातील राऊतवाडी आणि बर्की धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी जाणं हे धोक्याला निमंत्रण देणारे ठरणार आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे.
Kolhapur Rain Update: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur News) गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरु असल्याने नद्यांसह धरणांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. जिल्ह्यातील धबधबे सुद्धा प्रवाहीत झाल्याने वर्षा पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, धबधब्यांच्या ठिकाणी पाणी वेगात वाढत असल्याने त्याठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. शाहूवाडी तालुक्यातील बर्की गावाला जोडणारा पुलही पाण्याखाली गेला आहे.
राऊतवाडी धबधब्याचे रौद्ररूप
कोल्हापूर जिल्ह्यातील राऊतवाडी आणि बर्की धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी जाणं हे धोक्याला निमंत्रण देणारे ठरणार आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड, गगनबावडा आणि आजरा तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राऊतवाडी धबधब्याने रौद्ररूप धारण केलं आहे. त्यामुळे जीव धोक्यात न घालता राऊतवाडी धबधब्याकडे जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. राधानगरी धरणातून 1 हजार क्युसने भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होवून कोणत्याही क्षणी रस्ते बंद होण्याची शक्यता आहे.
बर्की गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला
दरम्यान, पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या बर्की धबधब्याकडेही पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने कासारी नदी पात्राबाहेर पडल्याने ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. कासारी नदीवरीलबर्की गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. पूल पाण्याखाली गेल्याने बर्की, बुरानवाडी, बरकी धनगरवाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे बर्की पुलावरून पर्यटक धबधब्याकडे जाऊ नयेत यासाठी शाहूवाडी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, बर्कीमध्ये 20 पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संततधार सुरु असल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 8 नद्यांवरील 23 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कोणते बंधारे पाण्याखाली?
- पंचगंगा नदी - शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
- भोगावती नदी - हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे
- कासारी नदी - यवलूज
- हिरण्यकेशी नदी - साळगाव
- घटप्रभा नदी - पिळणी, बिजूर भोगोली, हिंडगाव, कानर्डे-सावर्डे
- वेदगंगा नदी - निळपण, वाघापूर
- कुंभी नदी - कळे, शेनवडे
- वारणा नदी - चिंचोली, पाणगाव
इतर महत्वाच्या बातम्या