Kolhapur Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या ए. वाय. पाटलांनी ठोकला विधानसभा निवडणुकीचा शड्डू; म्हणाले, 'मविआच्या नेत्यांनी शब्द दिला...'
Kolhapur Politics: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ए.वाय.पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे त्यांच्या मतदारसंघातील अन्य नेत्यांसह नागरिकाचंही लक्ष लागलं होतं.
कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ए.वाय.पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे त्यांच्या मतदारसंघातील अन्य नेत्यांसह नागरिकाचंही लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता ए.वाय.पाटील यांनी महाविकास आघाडीत जाण्याचे संकेत दिले आहेत.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आणि महायुतीतील नेते, माजी आमदार के.पी.पाटील यांच्यामुळे उमेदवारी अडचणीत आल्यानंतर ए.वाय.पाटील (A.Y.Patil) यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. देसाई यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नाही मात्र, के पी पाटील यांनी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे.
विधानसभा निवडणूक लढण्यावर काय म्हणाले पाटील?
'गेल्या दहा वर्षांपासून मी विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election) लढवण्याचा प्रयत्न करत आहे. काही वेळा तडजोडी आणि नेत्यांच्या आग्रहामुळे मला थांबायची वेळ आली. मात्र यावेळी थांबणार नाही राधानगरीच्या लोकांच्या आग्रहास्तव मी ही विधानसभा निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला मी भूमिका घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. शाहू महाराज यांच्या विजयासाठी मी आणि सर्वांनीच प्रयत्न केले. महाविकास आघाडीने जो मला शब्द दिला आहे. 100 टक्के त्या शब्दाप्रमाणे ज्या पक्षाकडे जागा जाईल तिथून मला उमेदवारी देतील. महाविकास आघाडीतील कोल्हापूरचा एक आमदार हा विधानसभेत जाईल.' असा विश्वास ए.वाय.पाटील (A.Y.Patil) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी मला शब्द दिला आहे. ज्या पक्षाकडे उमेदवारी जाईल त्या पक्षातून मला उमेदवारी दिली जाईल असं ठरलं आहे. ज्या पक्षाकडे हा मतदारसंघ जाईल त्या पक्षाकडून मी निवडणूक लढवणार आहे, असंही ए.वाय.पाटील (A.Y.Patil) यांनी स्पष्ट केलं आहे, त्याचबरोबर या विधानसभा निवडणुकीमध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
ए. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष व सदस्यत्वाचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक आनंदराव यशवंतराव पाटील (A.Y.Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सुनील तटकरे यांना त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. आपल्या राजीनाम्यात, पाटील यांनी वैयक्तिक कारणे आणि पदावर वेळ देण्याच्या असमर्थतेचा उल्लेख करत राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान कोल्हापुरच्या राजकारणात ए. वाय. पाटील (A.Y.Patil) यांच्या या राजीनाम्यामुळे महायुतीला हा मोठा धक्का आहे. पाटील यांचा राजीनामा पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा परिणाम आहे का असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.